अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

मुंबई,७जुलै /प्रतिनिधी :-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजारानंतर निधन  झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती  एम. वेंकैया  नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर आणि चित्रपट क्षेत्रातील आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Image

दिलीप कुमार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले की, त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे.  त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले आणि भारतीय उपखंडात रसिकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केले.  दिलीप साब कायम भारतीयांच्या हृदयात राहतील. “

Image

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

उपराष्ट्रपती, एम. वेंकैया नायडू यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. असामान्य अभिनेत्याच्या अष्टपैलूत्वाचे स्मरण करीत नायडू म्हणाले, ‘महान‘ ट्रॅजेडी किंग’ या नावाने परिचित असूनही, हा दिग्गज अभिनेता सर्वोच्च अष्टपैलू कलाकारांपैकी एक होता आणि सामाजिक नाटकांपासून ते रोमँटिक हिरो सारख्या विविध भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या.

चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत नायडू म्हणाले, “अभिनयाच्या विविध छटांद्वारे अतुलनीय योगदानाबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतले काही महान कलाकार त्यांची वाहवा करतात.”

त्यांच्या काही महत्त्वाच्या भूमिकांचे स्मरण करीत उपराष्ट्रपती म्हणाले की, अमर, नया दौड़, गंगा जमुना, मधुमती आणि राम और श्याम या चित्रपटांमधील त्यांच्या काही भूमिका कायमच स्मृतीत कोरल्या आहेत. ते म्हणाले, “उपजत कलाकार म्हणजे स्वतःच एक कलासंस्था म्हणून सर्वत्र वाखाणला जातो आणि भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनय हातोटी आणण्याचे श्रेय त्यांना जाते.”

उपराष्ट्रपतींनी दिलीपकुमार यांच्या कुटुंबीयांप्रति तसेच त्यांच्या देश- विदेशातील चाहत्यांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ चित्रपट अभिनेता दिलीप कुमार जी  यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या  निधनामुळे  आपल्या सांस्कृतिक जगताचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात मोदी यांनी आपल्या  भावना व्यक्त केल्या .

ट्विटसंदेशात पंतप्रधान म्हणाले, “दिलीप कुमारजी हे सिनेसृष्टीतील एक दिग्गज म्हणूनच कायम स्मरणात राहतील. त्यांना विलक्षण प्रतिभेची देणगी होती, ज्याद्वारे त्यांनी रसिकांच्या  अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक विश्वाची खूप मोठी हानी झाली आहे.  त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती  सहानुभूती व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो.“