लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळास २० कोटी रुपयांची तरतूद

मुंबई ,५ जुलै /प्रतिनिधी :-लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच २० कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान करण्यात आली आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वाटचालीची ही सुरुवात आहे; आणखी खूप कामे करणे बाकी आहे. राज्य सरकारने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कधीही निधीची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. महामंडळासाठी २० कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे आता जुलै २०२१ या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पुरवणी मागण्यांच्या यादीत या महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून १० कोटी रुपये आणि सहाय्यक अनुदान म्हणून १० कोटी असे एकूण २० कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षे केवळ कागदावर व घोषणेपूरते मर्यादित राहिलेल्या ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर या महामंडळास खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.