खुलताबाद मध्ये दूषित पाणीपुरवठा ,नगरपालिकेला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद ,५जुलै /प्रतिनिधी :-

गेल्या काही महिन्‍यांपासून खुलताबाद शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्या बाबत केलेल्या  जनहित याचिकेत मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाचे न्‍या.संजय  गंगापुरवाला आणि न्‍या. आर.एन. लड्डा यांनी प्रतिवादींना  नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी १३ ऑगस्‍ट रोजी ठेवण्‍यात आली आहे.

खुलताबाद येथील रहिवसी शेख अब्दुल माजीद अब्दुल महेमुद यांनी सदर जनहित याचिका  केली आहे. खुलताबादमध्ये गेल्या काही महिन्‍यांपासून  दूषित  आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. दूषित पाण्‍याचे नमुने सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्‍या प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्‍यात आले होते. त्‍यावर १८ एप्रिल २०२१ रोजी पाणी पिण्‍यास योग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला.

याबाबत स्‍थानिक नागरिकांनी खुलताबाद नगर परिषदेसह इतर वरिष्‍ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्‍याचा काही फायदा झाला नाही. या कारणास्तव शेख अब्दुल माजीद यांनी सुरज गोठवाल यांच्‍या मार्फत ही जनहित याचिका केली.याचिकेच्‍या प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठाने राज्याच्‍या मंत्रालयाचे मुख्‍य सचिव, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे सचिव, औरंगाबाद विभागीय आयुक्त, जिल्‍हाधिकारी, खुलताबाद नगर परिषदेचे अध्‍यक्ष यांना नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले. या  याचिकेत गोठवाल यांना  रुपाली गोठवाल (राजपुत), साईसागर अंबिलवादे यांनी सहाय्य  केले.