धक्कादायक! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी’, स्वप्नीलच्या आईने फोडला टाहो!

पुणे,४ जुलै /प्रतिनिधी:-  कोरोनानं गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात एका 24 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. फुरसुंगीजवळच्या गंगानगर इथे ही घटना घडली. एका विद्यार्थ्यानं MPSC ची परीक्षा दोन वर्षांपूर्वी पास केली मात्र अजूनही नोकरी न लागल्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

No photo description available.

स्वप्नील सुनील लोणकर (वय 24) असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. फुरसुंगी इथे राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली आहे. स्वप्नीलचे वडील हे प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा सिव्हिल इंजिनिअर  होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हतो. यामुळे तो नैराश्यात गेला होता.

स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती.  अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

स्वप्नील एमपीएससीच्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला.

कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. आणि त्यातून त्याने आपलं जीवन संपण्याचा निर्णय घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं म्हटलं आहे.

“परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर कदाचित आयुष्यच वेगळं असतं” असं स्वप्नीलनं चिठ्ठीत लिहून ठेवलंय. त्यामुळे त्यानं परीक्षांच्या अनियमिततेमुळे आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.

‘माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत होत नव्हती त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, तेव्हा या सरकारला कळेल मुलगा जाण्याचे दु:ख काय असते’ असं म्हणत स्वप्नील लोणकरच्या आईने आक्रोश केला आहे.