कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर – अजित पवार

  • केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन
  • ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याची गरज
  • कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची सर्वांची जबाबदारी
  • ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज
  • ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्राधान्य

पुणे,२जुलै /प्रतिनिधी :- कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण व्हावे,  असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज  दिले. महानगरासोबतच ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील  रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आताही संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, यांच्यासह आमदार ॲड अशोक पवार,आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही काही सूचना केल्या.

डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, लसीकरण वाढविले तर कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका रोखता येईल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त  राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली.  बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.