मंगल कार्यालयांच्या लग्न, समारंभाच्या बुकींगची यादी यंत्रणांनी घ्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद,२ जुलै /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात येत असून नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका रोखण्याच्या दृष्टीने कोवीड नियमावलीचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोवीड उपाय योजना आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.मंगेश गोंदावले, यांच्यासाह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Displaying IMG-20210702-WA0031.jpg

जिल्ह्यात निर्बंधासह सर्व व्यवहार चालू ठेवले असून त्यामध्ये नागरिकांनी, सर्व व्यापारी, आस्थापना, व्यावसासिकांनी कोवीड नियमावलीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी, वॉर्ड अधिकारी यांनी  दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच लग्न, समारंभ इतर कार्यक्रमाठीच्या उपस्थितीचे नियमानूसार पालन होणे आवश्यक असून या अनावश्यक गर्दीला नियंत्रणात ठेवण्याच्या अनुंषगाने मनपा, स्थानिक यंत्रणांनी सभागृह, मंगल कार्यालये, रिसॉर्ट यांच्याकडून लग्न, समारंभाच्या करण्यात आलेल्या बुकींगची यादी घ्यावी. तसेच संबंधित हॉल प्रमुखाला कोवीड नियमावलीचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल याबाबत सूचित करावे. दंडात्मक कारावाई नंतर ही नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे हॉल, मंगल कार्यालये, व्यापारी आस्थापना सील करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी निर्देश दिले.

तसेच जिल्ह्याला आवश्यक लससाठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून लसीरकण केंद्रावर सुव्यस्थित व्यवस्थापन ठेवून लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवण्यासाठी यंत्रणा मार्फत उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबतचा आढावा घेऊन प्राधान्याने प्रकल्प वेळेत उभारण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.