संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान:नाशिक जिल्ह्यातील अवनखेड राज्यात प्रथम तर अहमदनगर मधील लोणी (बु.)ला दुसरा क्रमांक

संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ,१ जुलै/प्रतिनिधी :- राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०१७-१८ अंतर्गत अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ग्रामपंचायतीस प्रथम, लोणी बु. ता. राहता, जि. अहमदनगर या ग्रामपंचायतीस द्वितीय तर कुशेवाडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अवनखेड ग्रामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सोहळ्यास  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी मान्यवर वर्षा या शासकीय निवासस्थानाहून उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच तसेच विजेती ग्रामपंचायत ज्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते त्या पंचायत समितीचे सभापती या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले, स्वच्छतेप्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन दृढनिश्चय करून प्रयत्न केले त्याप्रमाणे जर सर्व नागरिकांनी जर माझे कुटुंब, माझे गाव, माझे राज्य कोरोनामुक्त करून दाखवेन असा दृढनिश्चय केला व त्याप्रमाणे कृती केली तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

निधी कमी पडू देणार नाही

केवळ योजना जाहीर करून त्याचा उपयोग नाही. त्याचा पाठपुरावा व त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. हे करीत असताना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे महत्त्व लक्षात घेता या खात्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाणीपुरवठा खात्याचे व विजेत्यांचे अभिनंदन

आपले राज्य हागणदारीमुक्त झाले ही समाधानाची बाब आहे. गाव स्वच्छ असतील तर लोकांचे आरोग्य चांगले राहणार. लोकांची मने स्वच्छ करण्याचे कामही या अभियानाने केले आहे. या योजना तशाच पुढे सुरू राहतील असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. स्वच्छतेच्या बाबतीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या कामगिरीचे व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दिवंगत आर आर पाटील यांनी १९९९ मध्ये राज्यात स्वच्छता अभियान सुरू केले. श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग यातून चळवळ उभी राहिली. गावची गावे एकवटली व स्वच्छ होऊ लागली. यात सातत्य राखणे गरजेचे असून पाणीपुरवठा विभागाने हा कार्यक्रम शंभर टक्के कसा यशस्वी होईल यादृष्टीने नियोजन करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा सुरू केली आहे. १५ व्या वित्त आयोगातून  अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देत आहोत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील १६ लाख कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. निवडणुकीनंतर सरपंचांचे आरक्षण हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. सरपंच सभेचे आयोजन करण्यात येत आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून राज्य प्रगतीपथावर कसे राहील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत असेही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राज्यात सन २००१ पासून राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली आणि ती आजही अविरत चालू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली आहे. जगातील स्वच्छतेची सर्वात मोठी चळवळ असा या अभियानाचा गौरव युनायटेड नेशन्सने केलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जातात. मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जातात.

आपण यापूर्वी स्वच्छ भारत मिशन टप्पा-१, अंतर्गत जवळपास ७० लाख कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ दिलेला आहे. तसेच २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त केलेल्या आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता आपण स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ राबविणार आहोत. याद्वारे चालू वर्षात राज्यातील २२ हजार १७३ ग्राम पंचायतीमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार आहोत. त्याद्वारे गाव तेथे सार्वजनिक शौचालय, कंम्पोस्टखत, कचरा वाहतुकीसाठी तीनचाकी सायकल, बॅटरी सायकल, प्लास्टीक व्यवस्थापन शेड, गाळ व्यवस्थापन प्रकल्प, खताच्या खड्याचा नॅडेप प्रकल्प इ.निसर्गाचा समतोल राखून सार्वजनिक स्वच्छता राखणारे उपक्रम राबविणार आहोत, अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिली.

नाशिक जिल्ह्यातील अवनखेड राज्यात प्रथम

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ अंतर्गत अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक) या ग्रामपंचायतीस पंचवीस लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा, लोणी बुद्रूक (ता. राहता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीस वीस लाख रुपयांचा द्वितीय तर कुशेवाडा (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या ग्रामपंचायतीस पंधरा लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

कुटुंब कल्याण क्षेत्रातील कामगिरीसाठी स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार पारडीकुपी, ता. व जि. गडचिरोली या ग्रामपंचायतीस तर पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीसाठी स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, कान्हेवाडी तर्फे चाकण ता.खेड, जि. पुणे या ग्रामपंचायतीस तर सामाजिक एकतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार चांदोरे, ता. माणगांव, जि.रायगड या ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन लाख रुपयांच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी कोरोना प्रतिबंधक उपायांच्या अनुषंगाने शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी केले. विजय कदम यांनी सूत्रसंचलन केले व  आभार मानले.

फेसबुक आणि समाज माध्यमांतील थेट प्रक्षेपणास प्रतिसाद

गावा-गावात या पुरस्कारांबाबत मोठी उत्सुकता आणि चर्चा असते. त्यामुळे विविध समाज माध्यमांतून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. वीस हजारांहून अधिक लोकांनी हा सोहळा थेट पाहिला.