कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख ३२ हजार पासचे वाटप

मुंबई, दि.१६ : कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे त्या सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान सत्कार आपत्ती सेवा पदक देऊन करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील पोलीस दल गेल्या तीन महिन्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जनमानसात सुरक्षा व  सामाजिक बांधिलकी रहावी याकरिता अहोरात्र कार्यरत आहेत. लोकांच्या सुरक्षा पासून सुरक्षिततेपर्यंतची सर्व कामे पोलीस करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना अगदी मास्क लावा असे समजावून सांगण्यापासून ते सामाजिक अंतर राखण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतची सर्व कामे पोलिसांना करावी लागली. परप्रांतीय कामगारांना पाठवण्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांना कार्य करावे लागले.       

हे सर्व करत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला. त्यासही न डगमगता आपल्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य सुरूच ठेवले. दुर्दैवाने  आपल्या 42 पोलिस बांधवांना यात वीरगती प्राप्त झाली. राज्यातील पोलीस बांधवांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी गृह विभागातर्फे आपत्ती सेवा पदक देऊन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८५ हजार पास वाटप
६ लाख १७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ७ कोटी ६५ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. १६ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 85 हजार 089 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 6 लाख 17 हजार व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.22 मार्च ते 15 जून  या कालावधीत  कलम 188 नुसार 1,30,396 गुन्हे नोंद झाले असून 26,887 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 7 कोटी 65 लाख 19 हजार 701 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 266 घटना घडल्या. त्यात 851 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर – 1 लाख 3 हजारफोन

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,03,342 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. 

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन Quarantine असा शिक्का आहे अशा 730 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 6,17,242 व्यक्ती क्वॉरंटाईन Quarantine  आहेत, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1333 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 82,344 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 27 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 28, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस.1, मुंबई रेल्वे 2, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1, पालघर 1 अशा 42 पोलिस बांधवांना वीरगती प्राप्त झाली. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली. तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 204 पोलीस अधिकारी व 1195 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात सध्या एकूण 134 रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 4,437 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *