कालवा पाहणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा ताफ्यासह पिंपळगाव कोंझिरा बोगद्यातून प्रवास

May be an image of 1 person, standing and outdoors

शिर्डी,,२९जून /प्रतिनिधी :-निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाला गती देत या कामांचा दररोज आढावा घेणारे धरणाचे जनक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शासकीय ताफ्यासह संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील एक किलोमीटरच्या बोगद्यातून आरपार प्रवास करत कालव्याच्या कामाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात पिंपळगाव कोंझिरा वडगाव लांडगा येथील ग्रामस्थांनी कालव्यांच्या कामाला दिलेल्या गती  व निधीबद्दल मंत्री श्री. थोरात यांचा सत्कार केला. यावेळी अशोक भांगरे, मीनानाथ पांडे, कालवा कृती समितीचे नानासाहेब शेळके, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, पंचायत सदस्य विष्णुपंत राहाटळ, सरपंच बादशहा वाळुंज, बापूसाहेब करपे, उपसरपंच सौ. कुसुम गाढे, उपसरपंच सुभाष कर्पे, वडगाव लांडगा गावचे उपसरपंच राजेंद्र खानेकर, मनोज कोकणे, भाऊसाहेब वाळुंज, विकास आहेर, दत्तात्रय खिलारी, संभाजी वाळुंज, कार्यकारी अभियंता प्रमोद माने, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते.

May be an image of road

1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. 2012 पर्यंत भिंतीचे काम पूर्ण करत पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावले. याच काळात कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेशवाडी येथील मोठे बोगदे तयार करून घेतले. मात्र 2014 ते 19 या काळात काम थंडावले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येताच मंत्री श्री. थोरात यांनी या कामाला पुन्हा गती दिली. कालव्याचे काम कोरोना संकटातही अत्यंत जलद गतीने सुरू ठेवले असून अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर लांबीच्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी धरणालगत असलेल्या बोगद्याचे ब्लास्टिंग करून हा बोगदा खुला करण्यात आला .पिंपळगाव कोंझिरा येथील बोगदा ऐतिहासिक ठरला असून यामधून नामदार थोरात यांचा शासकीय ताफा व विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या असलेल्या वाहनांसह आरपार प्रवास करून या बोगद्याची पाहणी केली.

यावेळी मंत्री श्री. थोरात म्हणाले, निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाईल तो आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल. या कालव्यामध्ये असलेला पिंपळगाव कोंझिरा हा मोठा बोगदा असून यातून अनेक जण वाहतुकीसाठी ये-जा करत आहेत. प्रत्येकाने जोपर्यंत हा खुला आहे तोपर्यंत या बोगद्याचा अनुभव एकदा घ्यावा. हे काम जीवनातील ऐतिहासिक ठरले असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी पंचक्रोशीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कनकेश्वर तरुण मंडळाने  विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मच्छिंद्र आहेर व संदीप कर्पे यांनी केले. आभार प्रा.संतोष कर्पे यांनी मानले.