पत्रकारितेतील वैभव गेले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई, दि: १६ : ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.
पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्यावर आघातच झाला होता. प्रत्येक लढ्यात त्यांची साथ असायची. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. स्व. बाळासाहेब यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार, व्रतस्थ पत्रकार हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.१६ : ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत व्रतस्थ पत्रकार हरपला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, सन्माननीय दिनू रणदिवे हे महाराष्ट्रातले धडाडीचे, नावाजलेले, कृतीशील पत्रकार होते. ध्येयवादी, युवा पत्रकारांचे आदर्श होते. गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या मान्यवरांसोबत रणदिवेसाहेबांनी कारावास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरु केले होते. दिनू रणदिवेंनी पत्रकार म्हणून कारकीर्दीची इथूनच सुरुवात केली. मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गिरणगावातील कामगारांच्या लढ्याला रणदिवे साहेबांनी आपल्या लेखणीने समर्थ साथ दिली. आयुष्यभर त्यांनी कष्टकरी, वंचित, शोषित समाज घटकांच्या हितासाठी पत्रकारिता केली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

मुंबई दि. १६ : ज्येष्ठ पत्रकार, स्वांतत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी दु:ख व्यक्त केले आहे.
श्री. दिनू रणदिवे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत अशा एका प्रदीर्घ कालखंडाचे सजग साक्षीदार होते. आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून रणदिवे यांनी गरीब व उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा दशकांमध्ये रणदिवे यांनी राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
आधारवड कोसळला-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. १६ : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक शिलेदार, ज्येष्ठ पत्रकार, गोवा मुक्ती संग्रामातील सक्रिय सहभागी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दिनू रणदिवे आज आपल्याला सोडून गेले ही आपल्यासाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की पत्रकारिता क्षेत्र असो आमचा एक मोठा आधारवड कोसळला, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोक संदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे की, दोन महिन्यापूर्वीच मी त्यांची दादरच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यांच्याशी गप्पा केल्या, चर्चा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. तो क्षण माझ्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहील. तीस दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे सौ.सविताजींचे निधन झाले आणि आज ते आपल्याला सोडून गेले. हा मोठा आघात आहे.
दिनू रणदिवे यांनी नेहमीच पत्रकारितेतील मूल्ये जपली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आवाज उठविला. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य हे दीपस्तंभासारखे आहे. महाराष्ट्र ते कधीही विसरणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.
सात दशकातील घटनांचा साक्षीदार हरपला – अमित देशमुख

मुंबई, दि.१६ : ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनाने देशातील विशेषत: महाराष्ट्रातील गेल्या सात दशकातील घटनांचा साक्षीदार हरपला आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.
अमित देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, दिनू रणदिवे हे सव्यसाची पत्रकार होते. देशाचे स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील ग्रामीण भागापासून तर मंत्रालयात घडणाऱ्या घटनांची त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असे. त्यांनी केलेले वार्तांकन नेहेमीच तटस्थपणे आणि वस्तुस्थितीला धरून असल्याने ते नेहमीच वाचनीय ठरत असे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील, असेही अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि.१६ : ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे, अशा शोक भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा सामाजिक चळवळींमध्येही सहभाग होता. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दीपस्तंभच होते. 1956 साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नियतकालिकेतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली नंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले. दिनू रणदिवे यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला. दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण रणदिवे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.