उमरगा औद्योगिक वसाहतीत डिझेल सदृश्य द्रव पदार्थाचा अनाधिकृत साठा जप्त
तेरा लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त ; उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी केली कारवाई
उमरगा ,२६ जून / नारायण गोस्वामी
उमरगा शहराजवळील जकेकुर शिवारातील औद्योगिक वसाहतीतील, तांदळाच्या उद्योग केंद्रात (फॅक्टरी)अनाधिकृतपणे पेट्रोलियम पदार्थाचा (डिझेल सदृश्य द्रव) साठा आढळून आल्याने, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या पथकाने गुरुवारी धडक कारवाई करत, डिझेल सदृश्य द्रव पदार्थासह तेरा लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी कर्नाटकातील रहिवाशी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकासह जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांना मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस कॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवाड, श्री. बोदनवाड यांनी बुधवारी ता. २३ रात्री साडेदहा वाजता औद्योगिक वसाहतीतील श्री लक्ष्मी तिम्मप्पा फुड इंडस्ट्रीज (राईस मिल) येथे गेल्यानंतर, एका पत्र्याच्या शेडमध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या एका लोखंडी टॅंकर मध्ये पेट्रोलियम पदार्थाची अवैध साठवणूक केलेली दिसून आले. तेथे असलेल्या जाकिर पाशानियाँ चिद्री रा. दुबलगुंडी (ता हुमनाबाद जि. बिदर) या कामगाराकडे चौकशी केली असता, कंपनीचे व्यवस्थापक महेश गवळी रा.आळंद (जि.कलबुर्गी) असल्याची माहिती सांगितली. पोलिसांनी गवळी याला या व्यवसायासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सुचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी गुरुवारी ता. २४ दुपारी चार पर्यंत कागदपत्रे दिली नाहीत. गवळी याने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न केल्याने व साठ्याबाबत कोणतीही अधिकृत कायदेशीर माहिती न दिल्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी उदमले यांनी घटनास्थळाला भेट देवून दोन शासकीय पंचासमक्ष गुरुवारी सांयकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सविस्तर जप्ती पंचनामा केला. पंचनाम्या दरम्यान पेट्रोलियम पदार्थ व त्याचा साठा करण्यास वापरण्यात आलेली साधने जप्त करून त्याच्या सुरक्षिततेकरीता पोलिस गार्ड तैनात करण्यात आला आहे.
जप्तीमध्ये अकरा लाख २८ हजार रूपये किमतीचे बारा हजार लिटर डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ (अंदाजे प्रति लिटर दर ९४ रूपये प्रमाणे), दोन लाख किमतीचा पेट्रोलियम पदार्थ साठवणुकीसाठीचा लोखंडी टँक, दहा हजार रूपये किमतीची एक हिरव्या रंगाची सुुगुना कंपनीची इलेक्ट्रीक मोटर, पंधरा हजार रुपये किमतीची एक निळ्या पांढऱ्या रंगाची डिझेल भरण्याकरीता वापरण्यात येणारी मशीन असे एकुण तेरा लाख ५३ हजार रूपये किंमतीची साधने व डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवाड यांच्या फिर्यादीनुसार महेश गवळी व जागा मालक यांचे विरूध्द जिवनावश्यक वस्तुचे अधिनियम कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनि डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थाचे नमुने सी.ए. तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
अवैध धंदे बिनधास्त सुरू
उमरगा औद्योगिक वसाहतीत गेल्या ५/७ वर्षेपासून अनेक अवैध धंदे बिनधास्त सुरू आहेत. कारण येथून कर्नाटक सीमा व हैदराबाद जवळच येत असल्याने अवैध धंदेवाले सगळे उमरगा औद्योगिक वसाहतीकडे वळले .येथून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने दळणवळण सोयीचे ठरते.काही स्थानिकलोकप्रतिनिधी,काही अधिकारी तर स्थानिक भागातील काही घोषित पुढारी यांच्या सहकार्याने हे धंदे जम बसवू लागले.काही वर्षेपूर्वी याच औद्योगिक वसाहतीमध्ये अमली पदार्थाचा मोठा साठा सापडला होता.त्यावेळी हैद्राबाद ,बेंगलोर येथील पथक चौकशी आले होते.तर अनेक वेळा रेशनिंगचा तांदूळ ,गहू जप्त करण्यात आले होते.ह्या ठिकाणी बायोडिझेलचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून ,दररोज साधारणपणे ४०/५०/ टॅंकर हे औद्योगिक वसाहतीत येतात.येथे गुटखा फॅक्टरी सुरू सुरू होती अशी माहिती समजते.येथील तांदूळ फॅक्टरी बद्दल सुद्धा गेल्या दोन वर्षे पासून खुप मोठी चर्चा आहे.येथे कर्नाटकातील रेशनचा तांदूळ ,छुप्या मार्गाने आणले जाते . त्यावर काही तरी प्रक्रिया करून पॅकिंग करून खुल्या बाजारात विकला जात असल्याची चर्चा आहे .