देशात रुग्ण बरे होण्याचा दर 51.08% पर्यंत वाढला

कोविड-19 चाचणी समर्पित 900 पेक्षा जास्त प्रयोगशाळा

नवी दिल्‍ली, 15 जून 2020

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7,419 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,69,797 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 51.08% पर्यंत वाढला आहे; यावरून ही वस्तुस्थिती निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.सध्या 1,53,106 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)ने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 653 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 248 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण 901 प्रयोगशाळा). त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

जलद आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 534 (सरकारी: 347 + खाजगी: 187)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 296 (सरकारी: 281 + खाजगी: 15)

सीबीएनएएटी(CBNAAT) आधारित चाचणी प्रयोगशाळा: 71 (सरकारी: 25 + खाजगी: 46)

गेल्या 24 तासांत 1,15,519 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 57,74,133 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

राजकीय मतभेद दूर ठेवून पुढे येण्याचे अमित शहा यांनी केले सर्व पक्षांना आवाहन

भारत सरकार दिल्लीमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. राष्ट्रीय राजधानीतील कोविड -19 च्या परिस्थितीबद्दल दिल्लीत आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक झाली. त्यावेळी ते म्हणाले कि या महामारीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण सर्वांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिली आणि या निर्णयांची तळागाळातील लोकांपर्यंत प्रामाणिकपणे अंमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. दिल्लीतील जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले. लोकांच्या हिताच्या दृष्टीने राजकीय मतभेद दूर ठेवून पुढे येण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले. राजकीय ऐक्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि राजधानीतील साथीच्या परिस्थितीत सुधारणा करेल, असे ते म्हणाले. आपल्याला नवीन तंत्रज्ञानासह कोविड -19 चाचणी क्षमतेत सुधारणा करावी लागेल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. आपण सर्व या महामारीवर विजय मिळवू आणि एकजूट होऊन ही लढाई जिंकू असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

या बैठकीला आम आदमी पक्षाचे संजय सिंह, भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, बसपचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित नेत्यांनी कोविड -19 च्या विरोधातील लढ्यासंदर्भात प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्लीच्या तीन महानगरपालिकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत काल झालेल्या बैठकीत संक्रमणाविरूद्ध दिल्लीच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात दिल्ली सरकारला तातडीने 500 रूपांतरित रेल्वे कोचची तरतूद करणे, कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी 8,000 खाटा वाढविणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रात संक्रमित रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण आणि पुढील दोन दिवसांत कोविड-19 चाचणी दुप्पट करणे आणि सहा दिवसात चाचणी क्षमता तिप्पट करणे यांचा समावेश आहे. खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील कोरोना खाटांपैकी 60% खाटा कमी दराने उपलब्ध करून द्याव्या आणि कोरोना चाचणी व उपचारांचे दर निश्चित करावेत असे या बैठकीत ठरले. खाजगी रुग्णालयांसाठीच्या या मार्गदर्शक सूचनांचे निरीक्षण करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य, व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे ठरले. तसेच दूरध्वनी मार्गदर्शनासाठी दिल्लीतील एम्स अंतर्गत कोविड-19 हेल्पलाईन स्थापित करण्याचा निर्णय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.