सी. एस एम. एस. एस.मध्ये क्रीडा संकुल राजर्षी शाहू महाराज जयंतीला लोकार्पण

औरंगाबाद ,२४जून /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. पूर्ण सुविधा असलेले हे शहरातील सहावे क्रिकेट मैदान ठरणार आहे. क्रिकेट मैदानामध्ये आता सी. एस. एम. एस. एस. संस्थेने उभारलेल्या क्रिकेट मैदानाचा समावेश होणार आहे.

सी. एस एम. एस. एस. शिक्षण संस्थेने कांचनवाडी परिसरातच तीन एकर जागेत क्रिकेट मैदानाची उभारणी केली आहे. या क्रिकेट मैदानावर चार खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असून दोन खेळपट्ट्या या सरावासाठी वापरण्यात येणार आहे. मैदानावर हिरवळ असून स्वयंचलित यंत्रणेद्वारे मैदानाला नियमित पाणी देण्याची सुविधा उभारण्यात आली आहे. अवघ्या पाच  महिन्यांच्या कालावधीतच हे क्रीडा संकुल उभे राहिले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे व विश्वस्त समीर मुळे यांनी दिली.          

सी. एस एम. एस. एस. संस्थेत विविध खेळांची आधुनिक सुविधा उपलब्ध असावी, यासाठी संस्थेचे सचिव श्री.पद्माकरराव मुळे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी महिन्यापासून क्रिकेट मैदानाच्या उभारणीस प्रारंभ झाला, क्रिकेट क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांशी चर्चा विनिमय करून मैदान तयार करण्यात आले आहे. क्रिकेट मैदान पूर्णतः तयार झाले आहे, या मैदानावर लवकरच क्रिकेट सामने होऊ शकतील. असे पद्माकरराव मुळे यांनी स्पष्ट केले.             

क्रिकेट मैदानालगतच बास्केटबॉल कोर्ट, कबड्डी, व्हॉलीबॉलचे मैदान तयार करण्यात आले आहे, सर्व मैदाने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खेळाकडे कल वाढावा, या हेतूने तयार करण्यात आले आहेत. तसेच आंतर महाविद्यालयीन तसेच अन्य क्रिकेट स्पर्धा या मैदानावर होऊ शकतील. अशा पद्धतीने मैदानाची उभारणी करण्यात आली आहे. कमीत कमी जागा व कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल तयार करण्यात आले असल्याची माहिती पद्माकरराव  मुळे यांनी दिली .

शिक्षणाबरोबर खेळही आवश्यक- पद्माकरराव मुळे
सी. एस एम. एस. एस. प्रांगणात हजारो विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने हे क्रीडा संकुल उभे करण्यात आले आहे. अशी माहिती सी. एस एम. एस. एस.चे  सचिव श्री. पद्माकरराव मुळे यांनी दिली. उच्च दर्जाची सुविधा, दर्जेदार खेळपट्टी या खेळाडूच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी आहेत आणि ती सुविधा या क्रीडा संकुलात उपलब्ध आहे