लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेची मागणी अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे – खासदार इम्तियाज जलील

बदलापुर वक्फ प्रकरणाच्या धर्तीवर जालना रोड प्रकरणात गुन्हे दाखल होणार

औरंगाबाद ,२३ जून/प्रतिनिधी :- खासदार इम्तियाज जलील यांनी आज दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रित चौक येथे बांधण्यात यावे, जालना रोड येथील वक्फ मिळकत सिटीएस क्र. १२५०३ च्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील इतर विविध विकासाच्या मुद्दयांवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

       

पत्रकार परिषदेत खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले की, औरंगाबाद शहराची गरज व जनतेच्या प्राथमिकतेला प्राधान्य देवुन चिकलठाणा विमानतळ ऐवजी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावे अशी मागणी यापुर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्गच्या अधिकारी व रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आलेली आहे. सन २०१५ मध्ये सदरील रस्त्यावर सव्र्हिस रस्ते, पदपथांसह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये विविध ठिकाणी उड्डाणपूल, सायकल ट्रॅकचा समावेश करुन सुमारे ४०० कोटी निधी जाहीर करण्यात आले होता, परंतु सद्यस्थितीत फक्त ७० कोटी इतक्या कमी व मर्यादित निधीची मान्यता देण्यात आली असुन त्यामधुन सव्र्हिस रोड, सायकल ट्रॅक इत्यादी सुविधा वगळण्यात आलेले आहेत.          औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ अथवा इतरत्र ठिकाणी रहदारी व वाहतुक करण्यासाठी अमरप्रीत चौक या मुख्य रस्त्याचा वापर नागरीकांकडून होत असल्याने तेथे नेहमी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते, म्हणुन प्रत्यक्षात उड्डाणपूलाची आवश्यकता तेथे आहे. सद्यपरिस्थितीत प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. प्रस्तावित पादचारी क्रॉसिंग निरुपयोगी आहे कारण व्यावहारिकदृष्ट्या तिची उपयुक्तता शून्यइतकीच असल्याने फक्त सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.          औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेची मागणी व प्राथमिकता लक्षात घेता उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याच्या बाजूने जनतेचा कौल आहे. सुरवातीला उड्डाणपुल भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाने अमरप्रीत चौकात प्रस्तावित केले होते पण नंतर ते चिकलठाणा विमानतळासमोर का हलविण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित केला.
अमरप्रित चौक येथेच उड्डाणपुल व्हावे         

औरंगाबाद शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य जनतेच्या मागणीनुसार उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रित चौक येथेच करण्यात यावे याकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदारांनी सुध्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन मागणी केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी शासनाच्या पैशाचे अपव्यय करण्याच्या उद्देशाने उड्डाणपुलाबाबत अट्टाहास का करत असल्याचा थेट आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावला. अमरप्रित येथेच उड्डाणपुल करण्यात यावे याकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी लवकरच दिल्ली येथे जावुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. औरंगाबाद शहरातील सर्वसामान्य जनतेनी ट्विटव्दारे त्यांची मागणी व आक्षेप केंद्रीय मंत्री व भारतीय राष्ट्रीय महामार्गच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
जनआंदोलन उभे राहणार, खासदार यांची चेतावणी         

सर्व लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेच्या मागणीला दुर्लक्ष करुन भारतीय राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळासमोरच बनविण्याचा अट्टाहास करित असेल तर जनआंदोलन उभे राहुन उड्डाणपुलाचे कामच होवु देणार नसल्याची चेतावणी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
औरंगाबादेत सुध्दा गुन्हे दाखल करा         

औरंगाबाद शहरातील सिटीएस नं. १२५०३ कैलास मोटर्स, जालना रोड, औरंगाबाद येथील मालमत्ता पुर्णत: वक्फ बोर्डाची असुन त्याची दर्गा हजरत दाऊद औलिया मगरीबी यानावाने राजपत्रात नोंद सुध्दा आहे. केंद्रीय वक्फ बोर्ड कायदा व महाराष्ट्र शासनाच्या कायदा व नियमानुसार वक्फ बोर्डाची कोणतीही जागा कोणत्याही कारणास्तव: अथवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला / संस्थेला विकता येत नसुन ती फक्त ११ महिनेच मर्यादित काळेपुरते सामाजिक कामाकरिता वापरासाठी भाडेतत्वावर देण्यात येते. वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ५१ नुसार वक्फ मालमत्तेची आणि विशेषत: स्थावर मालमत्तेबाबत भाडेपट्टे किंवा इतर प्रकारे हस्तांतरण हे पुर्णत: बेकायदेशिर असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.         

वक्फ मालमत्ता विक्री, दान, गहाण इत्यादी प्रकारे कोणत्याही कारणास्तव: अथवा कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरण करता येत नसल्याने जामा मस्जिद ट्रस्ट बदलापुर ता.अंबरनाथ जि. ठाणे नोंदणीकृत वक्फ संस्थाची वक्फ मिळकतीचे खरेदी – विक्री करणाऱ्या व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.         

बदलापूर पश्चिम पोलीस ठाणेतंर्गत वक्फ मिळकतीचे खरेदी – विक्रीचे व्यवहार करणारे दोन्ही संबंधितांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हेच्या धर्तीवर सिटीएस नं. १२५०३ जालना रोड, औरंगाबाद वक्फ बोर्ड जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करुन बेकायदेशिर व नियमबाह्य बांधकाम करुन जवळपास १०० कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्यांची व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या संबंधित सर्व अधिकारी आणि सदरील मिळकतीचे खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करुन विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केली.
रजिस्ट्री कार्यालय बनले भ्रष्टाचाराचे गड, वरिष्ठांचे आदेश व शासकीय नियमांना दुर्लक्ष           

खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संबंधित सर्व विभागांना जालना रोड वक्फ मालमत्ते संबंधी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येवु नये अन्यथा कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी सुध्दा रजिस्ट्री कार्यालयाला दर्गाह हजरत दाऊद गंज लश्कर मगरीबी औलिया, औरंगाबादच्या संबंधित वक्फ मिळकत सिटीएस क्र. १२५०३ क्षेत्र ९२५६.३ चौ.मि. नोंदणीकृत दस्तावेज रद्द करुन संबंधितांवर कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहे. याव्यतिरिक्त महानिरिक्षक नोंदणी विभाग पुणे व जमावबंदी आयुक्त पुणे यांनी सुध्दा औरंगाबाद येथील रजिस्ट्री कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदरील वक्फ मिळकतीचे कोणत्याही प्रकारच्या दस्तांची नोंदणी करण्यात येवु नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहे.         

वरिष्ठांचे व संबंधित विभागाचे आदेश, शासकीय नियमाच्या विरोधात औरंगाबाद येथील रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धन्नासेठ यांच्यासोबत कोट्यावधींची आर्थिक उलाढाल करुन वक्फ मिळकतीचे अवैधरित्या व बेकायदेशिररित्या दस्त नोंदणी केलेली आहे.
वक्फ मिळकतीचे खरेदी – विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार           

जालना रोड येथील वक्फ मालमत्तेवर अवैध व बेकायदेशिररित्या बांधकाम करुन दुकाने विक्री व खरेदी करणारे दोन्ही तसेच सर्व नियमबाह्य व्यवहारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या शासकीय कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
वक्फ बोर्डातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठवणार         

जालना रोड येथील वक्फ मालमत्ता प्रकरण असो अथवा इतर प्रकरणात वक्फ बोर्डातील काही अधिकारी व कर्मचारी संगनमताने धन्नासेठासोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करुन वक्फ मालमत्ता विक्री व खरेदी करण्यास सहकार्य करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वक्फ बोर्डाचे सदस्य या नात्याने पाच वर्षाच्या संपुर्ण कार्यकाळात वक्फ मालमत्तासंबंधी भ्रष्टाचार करणाऱ्यां सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तुरुंगात पाठविणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.