ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड महापारेषणचे सीएमडी दिनेश वाघमारे यांना जाहीर

२७ ऑगस्टला सोनमर्गला पुरस्काराचे वितरण

मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :-नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड-२०२१’ हा पुरस्कार महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) दिनेश वाघमारे यांना जाहीर झाला आहे. त्यामुळे महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २७ ऑगस्ट, २०२१ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये होणाऱ्या ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर परिषदेत हा पुरस्कार दिला जाणार आहे.

कंपन्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी व उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सांघिक व्यवस्थापन आणि कंपनीच्या शाश्वत व निरंतर प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दि. 23 जानेवारी, 2020 रोजी रुजू झाले. सध्या ते ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत.

श्री. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील 27 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) केले आहे. ते आय.आय.टी. खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एम.एस्सी. केले आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा मोठा अनुभव आहे.