शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक,काय झालं बैठकीत?

नवी दिल्ली ,२२जून /प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.  या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  माजिद मेमन यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. जवळपास अडीचतास चाललेल्या या बैठकीत साधारणपणे १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांचा या समावेश होता.

Image

पत्रकारपरिषदेत बोलताना माजिद मेमन म्हणाले, आजच्या बैठकीत विशेष करून, राष्ट्रीयमंचची जी विचारसरणी आहे व जो कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत असं अशी चर्चा झाली की आज जे देशात जे राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण  बनलं आहे,  त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी  राष्ट्रमंचाची  काय भूमिका असेल. यावर सर्वांचे मत घेण्यात आलं आहे. यामध्ये काही अराजकीय व्यक्ती देखील सहभागी होते.  जावेद अख्तर, न्यायमूर्ती एपी शहा यांनी देखील आपलं मत मांडलं.  म्हणून हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ज्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं उचित ठरणार नाही.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, भाकप, आप, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. ही बैठक संपल्यावर माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात बैठकीत काय चर्चा झाली आणि काय ठरलं?

माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते.  राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती.

सुरूवातील माजिद मेमन यानी सांगितलं,   याबाबत खुलासा करणं अतिशय आवश्यक आहे, कारण माध्यमांमध्ये मागील २४ तासांपासून ज्या बातम्या सुरू आहेत की, ही राष्ट्रमंचची बैठक भाजपा विरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी बोलावली आहे. मात्र असं काहीच नाही. सर्वात अगोदर तर मी हे सांगू इच्छितो की, ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली आहे. मात्र ही बैठक शरद पवार यांनी बोलावली नव्हती. ही बैठक राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती व आम्ही सर्व जे राष्ट्रमंचाचे सदस्य आहोत, आम्ही सर्वांनी मिळून या बैठकीचे आयोजन केले होते.

तसेच, अशा देखील चर्चा सुरू आहेत की शरद पवारांच्या माध्यमातून हे एक मोठं राजकीय पाऊल उचललं जात आहे व ज्यामध्ये काँग्रेसला वेगळं पाडण्यात आलं आहे, मात्र ही माहिती देखील चुकीची आहे. राजकीयदृष्ट्या अशी कोणतीही मोठी घडामोड झालेली नाही. आम्ही त्या सदस्यांना बोलावलं होतं की जे आमच्या राष्ट्रमंचाच्या विचारसरणीशी सहमत आहेत. यामध्ये सर्व राजकीय पक्षातील लोक येऊ शकतात, यामध्ये कोणताही राजकीय मतभेद नव्हता. असं मेमन म्हणाले.

बैठकीत उपस्थित नेत्यांची नावे

शरद पवार

सुप्रिया सुळे

यशवंत सिन्हा

पवन वर्मा

डी राजा

ओमर उब्दुल्लाह

जस्टिस ए पी शाह

जावेद अख्तर

अॅडवोकेट माजिद मेमन

खासदार वंदना चव्हाण

सुधेंद्र कुलकर्णी

अरूण कुमार, अर्थशास्त्रज्ञ

निलोलपाल बासू, माजी खासदार सीपीएम

जयंत चौधरी

घनश्याम तिवारी, समाजवादी पार्टी

बिनॉय विश्वास, खासदार

सुशील गुप्ता, आम आदमी पार्टी

के. सी. सिंग

पवारांची नवी आघाडी हा बातमीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची टीका

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा राजकारणात शून्य अस्तित्व असलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नसल्याने नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. भांडारी म्हणाले की, पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका आणि, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची पवार यांची धडपड यांमुळे अगोदर अस्तित्वात असलेली युपीए आघाडी अधिक मोडकळीस आली आहे. पहिल्या आघाडीचा अस्त होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचा नव्या आघाडीचा प्रयत्न हे त्यांच्या राजकीय नैराश्याचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधाराची थट्टा करून, विश्वासघाताने आघाडी करणाऱ्या पवार यांना राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची अखेरची संधी आहे, एवढेच या धडपडीतून स्पष्ट होते.

शरद पवार यांची युपीएचे नेतृत्व करण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्याचा उच्चार ते आपल्या समर्थकांकरवी वारंवार करत असतात. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वितुष्ट टोकाला गेले असून नवी आघाडी हा काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सोनिया गांधी अस्वस्थ झाल्याने या बैठकीस काँग्रेसचा सहभाग नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचाच तो डाव असल्याने इतर क्षुल्लक पक्षांची मोट बांधून तो अमलात आणण्याची योजना आहे. त्यामुळे अशा प्रयत्नांचा भाजपच्या भक्कम जनाधारावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, पवार यांच्या बैठकीस त्यांच्या विश्वासू शिवसेनेनेही दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्या बैठकीस हजेरी लावून सोनिया गांधींची नाराजी ओढवून घेण्याची शिवसेनेची हिंमत नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे असे प्रशस्तीपत्र देणाऱ्या पवार यांना शिवसेनेने धोबीपछाड देऊन आपल्या विश्वासपात्रतेचा पुरावा दिला आहे.

राज्यात आढळलेल्या कोरोनाशी संबंधित डेल्टा व्हेरिएंट च्या रुग्णांची वेळीच दखल घेऊन त्या मागच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणीही श्री. भांडारी यांनी केली.