जलद लसीकरण ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करत परिस्थिती पूर्ववत करण्याची गुरुकिल्ली : डॉ व्ही के पॉल

एका दिवसात किमान एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट : डॉ एन के अरोरा

नवी दिल्‍ली/मुंबई, २२जून /प्रतिनिधी:-

देशातील कोविड लसीकरण मोहिम सुधारित मार्गदर्शक धोरणांनुसार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, भारताने 81 लाखांपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी दिले आहे.

21 जूनची उद्दिष्टपूर्ती भारताची लसीकरण क्षमता दर्शवणारी

डीडी न्यूज वाहिनीशी बोलतांना त्यांनी सांगितले की पहिल्याच दिवशी भारताने केलेल्या लसीकरणावरून भारताची लसीकरण करण्याची क्षमता सिध्द झाली आहे. एवढ्या व्यापक पातळीवर इतक्या मोठ्या संख्येने कित्येक दिवस आणि आठवडे आपण लसीकरण करु शकतो. “केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये योग्य नियोजन आणि समन्वय असल्यामुळेच हे लसीकरण मिशन मोड वर करणे शक्य झाले,” असे डॉ पॉल म्हणाले.

“तिसरी लाट येणार की नाही हे आपल्याच हातात आहे.”

आपण सर्वांनीच कोविड विषयक नियम आणि वर्तणुकीचे पालन केले तसेच, अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल. असे अनेक देश आहेत, जिथे दुसरी लाटही आली नाही. आपण नियमांचे पालन केले तर हा काळ देखील निघून जाईल.

सर्वसामान्य व्यवहार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी लस हाच सर्वोत्तम उपाय

डॉ पॉल यांनी यावेळी जलद लसीकरणाचे महत्व अधोरेखित केले. भारताची अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करत सगळे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी जलद लसीकरण आवश्यक आहे, असे ते म्हणाले. “आपल्याला आपली दैनंदिन कामे पुन्हा सुरु करायची आहेत, सामाजिक जीवन पूर्ववत करणे, शाळा उघडणे, व्यवहार आणि आपल्या अर्थव्यवस्थेची गती वाढवयाची आहे. मात्र आपण जलद लसीकरण केले तरच या सर्व गोष्टी पूर्ववत करणे शक्य होईल.”

“लसींमुळे लोकांचे जीव वाचताहेत, लस घेण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे”

लस असुरक्षित आहे, असे समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. “जगातील सर्वच लसींना सध्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, भारतातही पण तेच केले आहे. समाजातील विविध स्तरातल्या लोकांनी लस घेतली आहे. “आता दुसरी लाट कमी होते आहे, आणि कोविड लस घेण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे.” असे त्यांनी पुढे सांगितले.

आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी लस देऊन सुरक्षित करण्याच्या निर्णयामुळे आपण दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवू शकलो. ‘खूप कमी आरोग्य कर्मचाऱ्यांना या काळात संसर्ग झाला. नाहीतर, आपल्या आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालये दुसऱ्या लाटेत कोलमडली असती. त्यामुळे, याची खात्री बाळगा, की लसींमुळे लोकांचा संसर्गापासून बचाव होतो आहे.” 

दररोज 1.25 कोटी लसींच्या मात्र देण्याची भारताची क्षमता

भारतातील लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लगार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ एन के अरोरा देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आज आपण लसीकरणाचे जे लक्ष्य पूर्ण केले, ती एक मोठी उपलब्धी आहे, असे ते यावेळी म्हणाले. “आज आपण जे साध्य केले ती मोठी उपलब्धी आहे. दररोज किमान एक कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे आपले उद्दिष्ट आहे आणि आपली एवढी क्षमता आहे की आपण सहज दररोज 1.25 कोटी लसींच्या मात्रा देऊ शकतो.”

खाजगी क्षेत्रांकडून चांगले सहकार्य मिळाल्यास हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल, असे अरोरा म्हणाले. आज नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, पहिल्याच दिवशी आपण ज्या संख्येने लसीकरण केले, त्यातच हे सिध्द झाले, असेही अरोरा यावेळी म्हणाले.

याआधी देखील भारताने असे यश संपादन केले आहे, याविषयी बोलतांना डॉ अरोरा म्हणाले, “आज झालेली कामगिरी अभूतपूर्व नाही. याआधी आपण एका आठवड्यात 17 कोटी मुलांना पोलिओची लस दिली आहे. म्हणजेच, ज्यावेळी भारत काहीतरी साध्य करण्याचा निश्चय करतो, त्यावेळी, आपण ते साध्य करु शकतो.” भारताची कोविड लसीकरण मोहीम म्हणजे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम केल्यास, देशाला भेडसावणाऱ्या समस्या कशा सोडवता येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे.” असे ते पुढे म्हणाले. .

लसीविषयीची भीती आणि उदासीनता दूर करण्यासाठी लोकसहभाग मह्त्वाचा

लसीकरण मोहिमेबाबत सुरु असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत NTAGI चे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी यावेळी व्यक्त केले. “लसीविषयीची भीती दूर करण्यासाठी लोकभागीदारी आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. शेवटी स्वतः पुढे येऊन लसीकरण करवून घेणे लोकांच्याच हातात आहे”.

लसीकरणाबाबतची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची जनजागृती मोहीमेची तयारी सुरु आहे. त्यासाठी आशा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांनी याआधीच काम सुरु केले असून, तळागाळात लसीबाबतचे  गैरसमज दूर करण्याचे काम सुरु आहे. 

“लस पुरवठ्याबाबत कोणतीही समस्या येणार नाही.”

लस पुरवठ्याबाबत कोणतीही समस्या आता येणार नाही, असेही अरोरा यांनी सांगितले. ‘आपल्याकडे सुमारे 20 ते 22 कोटी लसींच्या मात्रा पुढच्या महिन्यात उपलब्ध होतील.” लसीकरण मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागापर्यंत पोचवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सर्वदूर पसरली आहे, अशी माहितीही डॉ पॉल यांनी यावेळी दिली.

कोविशिल्ड लसींच्या मात्रांमधील सध्याचा कालावधी बदलण्याची गरज नाही

कोविशिल्ड लसींच्या दोन मात्रांमधील अंतराचा कालावधी बदलण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की हा कालावधी बदलण्याची काहीही गरज नाही.” आम्ही राष्ट्रीय लस मागोवा व्यवस्थेकडून वेळोवेळी माहिती आणि आकडेवारी संकलित करतो आहोत. तसेच, लसींची प्रभावक्षमता, दोन मात्रांमधील अंतर, प्रदेशांनुसार प्रभाव, विषाणूचे बदलते स्वरूप या सगळ्याचे सातत्याने अध्ययन आणि पाठपुरावा करतो आहोत. त्यावरून कोविशिल्ड लसींच्या मात्रांमधील कालावधी बदलण्याची गरज वाटत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना लसीच्या प्रत्येक मात्रेचा संपूर्ण लाभ मिळावा असे प्रयत्न आहेत. सध्या दिल्या जात असलेल्या मात्रा, त्यादृष्टीने लाभदायक असल्याचे जाणवत आहे.” असे सांगतांनाच, विज्ञानाचा कोणताही नियम काळ्या दगडावरची रेष नसते, असेही त्यांनी नमूद केले.