‘स्वारातीम’ विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा 

नांदेड,२१जून /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने ‘आंतरराष्ट्रीय योग’ दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ. रवि सरोदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.

या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमिताने आयुष मंत्रालयाचे प्रमाणित योग प्रशिक्षक तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक शिवा बिरकले, आयुष मंत्रालयाच्या प्रमाणित योग प्रशिक्षिका तथा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षिका सायली मेनन, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षिका संज्योत पेडगावकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक परमेश्वर कोलपेवाड, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक महेश भुरे यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. करोना पार्श्वभूमीमुळे साथरोग प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करून विद्यापीठातील संचालक, अधिकारी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस चंदन हार अर्पण करून या योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी या योग शिबिराला शुभेच्या दिल्या.

या योग शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी केले. तर सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. तसेच कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या निर्देशानुसार कोरोना काळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी दि.२२ ते २४ जुलै २०२१ या कालावधीमध्ये दररोज सकाळी ०६:३० ते ०८:०० या वेळेत व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने पुढील तीन दिवस ‘योग प्राणायाम व ध्यानधारणा शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ विद्यापीठातील संचालक, अधिकारी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.