स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावलं!

मुंबई,१९ जून /प्रतिनिधी :-  शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.काँग्रेसनं राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी त्यावर सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं आहे. “जे अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार?” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, “लोक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिलेत, तर लोक जोड्याने मारतील”, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसला यावेळी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये देखील सुनावलं. “स्वबळाविषयी मी का सांगतोय तर जे अनेक जण सध्या स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचंय मला की स्वबळ म्हणजे फक्त निवडणूक लढण्यापुरतंच असायला हवं असं नाही. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकलं तर आनंद आहे. पण हारल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते”, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल.“करोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे.”

शिवसेनेचे भवितव्य काय?; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान

 ‘मुख्यमंत्रिपदाची झूल काही काळ बाजूला ठेवून मी माझ्या शिवसैनिकांशी संवाद साधत आहे’, असे नमूद करत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी शिवसेनेच्या भवितव्यावरही त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले.

 दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाक्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ‘त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’, असे बाळासाहेब सांगायचे. सध्या हे वाक्य सर्वत्र ऐकायला मिळत आहे. हीच शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. रक्तपात हा शिवसेनेचा गुणधर्म नाही तर अन्यायावर वार करणं हा शिवसेनेचा गुणधर्म आहे. शिवसैनिक संकटाच्या वेळी धावून येतो. रक्तपातासाठी नाही रक्तदानासाठी तो ओळखला जातो. शिवसेनेवर जे आरोप करत आहेत त्यांची अशी ओळख आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना रुबाबात पुढे चालली आहे. हीन दर्जाचं राजकारण आम्ही केलं असत, सत्ता मिळालीच पाहिजे असा हट्ट धरला असता, त्यामागे धावलो असतो तर शिवसेना टिकली नसती. आज शिवसेनेला ५५ वर्षे पूर्ण झाली आणि त्यापुढे आम्ही मार्गस्थ झालो आहोत. शिवसेना हा काही नुसता राजकीय पक्ष नाही. ही एक परंपरा आहे. हा एक विचार आहे. प्रबोधनकार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. ही परंपरा पुढची शंभर, दोनशे, तिनशे वर्षे अशी शतकानुशतके चालत राहणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला निवडणुकीच्या राजकारणातून संपवू असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी भाजपला हे प्रत्युत्तरच दिले.

शिवसेना 55 वा वर्धापन दिन
मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

55 वर्षांच्या वाटचालीच श्रेय ज्यांनी शिवसेना जोपासली त्या शिवसैनिकांच…. त्यांना सर्वप्रथम अभिवादन!
आपल काम बोलतंय… अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन.
अस भाषण करण कठीण… समोर आपले शिवसैनिक नसताना मी एकतर्फी बोलतोय.
खर म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत… आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय?
जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाच.
ज्या वेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता… मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर…
स्वबळ म्हणजे फक्त निवडणूका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ..
गेल्या निवडणूकीत जे दुर्दैवाने पराभुत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला… त्यांना मी सांगितल पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला.
संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आपली शिकवण.
जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पूढे गेले…. ते स्वबळ.
स्थानिय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलन कार्यक्रमात मी जातो… त्या भागात चौफेर पाहतो. चौफेर पाहताना मोठमोठ्या ऑफिसकडे, इमारतींकडे, गच्चीतुन, खिडकीतुन, झाडावर चढुन लोक पहात असतात. हे अप्रुप आहे.
पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणुस पेटुन उठला.
टीका करणारे तुम्हीं काहीही केलत तरी टीका करणार…. तुमच्या मनाला जे पटत ते करा.
हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता.
आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये.
देशाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. जर या अस्मितेवर घाला आला तर संघराज्याच्या पायावर घाला होतोय.
आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, पण ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, देश आधी…
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा…
या सेनापती बापटांच्या काव्यपंक्ती! ही ताकद महाराष्ट्राची आहे का? जरुर आहे.
बंगाल ने आज स्वत्व काय हे दाखवुन दिलंय…
वंदे मातरम हा क्रांतीचा महामंत्र दिला…. त्याच बंगालने प्रादेशिक अस्मिता जपण्याचा मंत्र दिला.

माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे… हिंदुत्वाबद्दल सांगत असताना अनेकांचा गैरसमज होतो की महा विकास आघाडी म्हणजे हिंदुत्व सोडलं… ते काही पेटन्ट नाही कोणाचे. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे.
55 वर्षे आपण जे राजकारण पाहिल त्यात जे दिग्गज राजकारणी होते… आताच्या नेत्यांची उंची कळतेय. या कोरोना च्या काळातही जे राजकारण चालले आहे ते राजकारणाचे विकृतीकरण होते, किंबहुना विद्रुपीकरण आहे.
तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणे हे माझे भाग्य… हे सर्व तुमच्या मेहनतीच आणि आशिर्वादाच फळ. तुमच्याशिवाय मी एक पाऊल काय, एक कणही पूढे जाऊ शकत नाही.
आपल्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे…. पहिल्या, दुसर्‍या लाटेच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. फोन आला की धस्स होत असे. परंतु प्रशासनाची मेहनत, जनतेची मदत शिवसैनिकांची समाजसेवा इ. च हे फलित आहे.
खुन खराबा करणे हा शिवसैनिकाची ओळख नाही परंतु अन्यायावर वार करणे आहे…. रक्तपात नाही तर रक्तदान करणे ही शिवसैनिकांची ओळख आहे. आरोप करणार्‍यांपैकी कितीजणांची ही ओळख आहे?
हज्जारो शिवसैनिकांनी रक्तदान केले… तेंव्हा विचारत नाही की हे कुणाला दिल जाणार. हे शिवसेनेच हिंदुत्व
प्रत्येक आपत्तीत पहिला धावुन जातो तो शिवसैनिक… बदनामी करण सुरु आहे. जो आरोप करतोय तो कोण?
आम्हीं आमच्या रुबाबात जात आहोत… 55 वर्षे काही साधीसुधी नाहीत.
शिवसेना अजुनही एक एक पाऊल पूढे जात आहे…
महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही… अजुन किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड नंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत.
पोस्ट कोविड आरोग्यच्या तक्रारी आहेत परंतु अन्य देखील परिस्थिती उद्भवणार आहे… परिवारातील लोक निवर्तली आहेत, कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत, अनेक रोजगार बुडाले आहेत.
रोजीरोटी मंदावली आहे… पोस्ट कोविड माझ काय होणार या एका चिंतेत देशवासी आहेत. अशा वातावरणात स्वबळ इ. देशवासी ऐकुन घेणार नाहीत. हा विचार आपण केला नाही तर अराजकता मोठा शब्द ठरेल परंतु अस्वस्थतेकडे चालला आहे.
सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही…
वर्धापन दिनी राजकीय कार्यक्रम देण्याऐवजी कोरोना मुक्तीचा कार्यक्रम देणारे कोणी नसतील…
कोरोना मुक्ती हा एक उपक्रम न राहता चळवळ निर्माण व्हायला हवी… कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही.
कोरोनातुन बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत यात सहभागी होत नाही तोपर्यंत हे कठीण नाही तर अश्यक्य आहे.
सत्तेसाठी लाचार होणार नाही, परंतु उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही.
आम्हीं आमच्या पाऊलावर खंबीरपणे पुढे वाटचाल करू… ही शिवसेनेची ताकद, हे शिवसेनेचे ब्रीद!
शिवसेना ही एक संघटना नाही, तो एक विचार आहे… तो पूढे जात राहणार आहे. शतकानुशतके! जय हिंद, जय महाराष्ट्र!!