अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माईंड अजून मोकाटच-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ,१९ जून /प्रतिनिधी :- अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माईंड अजून मोकाटच असल्याचे स्पष्ट मत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडले आहे.

या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे. मागील २-३ महिन्यांपासून वाझे यांना अटक करण्यात आली आहे. आता प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली. मात्र यातील खरा सूत्रधार अजून मोकाट फिरत आहे. इतके दिवस चौकशी सुरु ठेवणे म्हणजे ही पंचवार्षिक योजना आहे का? असा संतप्त सवालही मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याशिवाय एवढे धाडस कोणी करू शकत नाही, यातील मुख्य आरोपीला वाचवण्याचा मुद्दाम प्रयत्न होत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

याबाबत प्रसारमाध्यमांनीच ज्या व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश केला आहे त्याच्यावर कोण्या बड्या नेत्याचा वरदहस्त आहे का ?अशी शंका आहे. त्यामुळेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पत्र लिहिण्याचे धाडस करण्यात आले, असे स्पष्ट मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.