नांदेड जिल्हाप्रमुख :शिवसेनेचे नेते मुंबईत तळ ठोकून 

नांदेड ,१९जून/प्रतिनिधी :- राज्यातील सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असल्याने आता नांदेड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख बदलांचे वारे वहात असून विद्यमान पदाधिकार्‍यांसह अनेक इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला आहे. येत्या काही दिवसात नव्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला टक्कर देणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. हदगाव, देगलूर, लोहा, नांदेड यांसह काही विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व होते, पण सध्या जिल्ह्यात नांदेड दक्षिण मतदार संघातील बालाजी कल्याणकर हे एकमेव आमदार आहेत. शिवाय महापालिकेतही कल्याणकरच एकटे नगरसेवक आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची एकप्रकारे पडझड सुरू आहे. एकेकाळी शिवसेनेचा जिल्ह्यात मोठा थाट होता. वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व होते, पण अलीकडच्या काळात पक्षात मरगळ आली आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी पक्षाने दत्ता कोकाटे, उमेश मुंडे व आनंद बोंढारकर या तिघांना जिल्हाप्रमुख पदाची संधी दिली होती. या तिघांकडे वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. या पदाधिकार्‍यांनी आपापल्यापरिने पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, पण वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पक्षाला अपयश आले.

राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद असले तरी जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. पक्षाची पडझड होत असताना पदाधिकार्‍यांच्या बदलाचा विषय यापूर्वीच झाला होता, पण वेगवेगळ्या कारणांमुळे हा विषय बाजूला ठेवण्यात आला होता, पण आता पुन्हा जिल्हाप्रमुखांच्या बदलांची जोरदार चर्चा सुरू आहे.

जिल्हाप्रमुख पदासाठी बाळासाहेब देशमुख बारडकर, प्रकाश मारावार, ज्योतिबा खराटे, माधव पावडे, आकाश रेड्डी यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. शिवाय विद्यमान आपले पद शाबूत ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. विद्यमान पदाधिकारी व इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला असून आपापल्यापरिने या सर्वांनी पद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत शिवसेनेच्या नव्या पदाधिकार्‍यांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आगामी काळात काही नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाला संधी देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.