राजकारणापलीकडेही अनेक क्षेत्र आहेत जेथे प्रामाणिकपणे काम करून यशाची पावती मिळते -मानसिंह  पवार

औरंगाबाद, ,१८जून /प्रतिनिधी :- ”प्राणिकपणा, श्रद्धा, धैर्य आणि करुणा या गुणांच्या बळावरच जी काही कामे हाती घेतली ती यशस्वीपणे पूर्ण करता आली, ज्या संस्थांमध्ये काम केले त्या नावारूपाला आल्या. राजकारणापलीकडेही अनेक क्षेत्र आहेत जेथे अत्यंत प्रामाणिकपणे काम करून समाजाकडून यशाची पावती मिळते हे आज रोटरीच्या पुरस्काराने अतिशय स्पष्टपणे अधोरेखित केले” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक मानसिंह  पवार यांनी केले.


रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे दिला जाणारा मानाचा ‘औरंगाबाद भूषण’ पुरस्कार या वर्षी मानसिंह  पवार यांना जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचा वितरणाचा ऑनलाईन कार्यक्रम आज पार पडला. या सत्कारप्रसंगी रोटरी क्लब औरंगाबादचे अध्यक्ष विजय जैस्वाल, सचिव समीर कानडखेडकर, कोषाध्यक्ष सरिता लोणीकर, प्रकल्प प्रमुख मुकुंद सांगवीकर तसेच संजीवनी पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
ऋतुजा सोमाणी हिने यशवंदना सादर केले. आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या प्रसंगी अध्यक्ष श्री. जैस्वाल यांच्या हस्ते मानपत्र तसेच शाल, आणि रोटरीचे सन्मानचिन्ह देऊन श्री. मानसिंह पवार यांचा सत्कार करण्यात आला.स्वाती जैस्वाल यांनी संजीवनी पवार यांचा सत्कार केला.
वडिलांचा फार मोठा राजकीय वारसा असूनही राजकीय क्षेत्रात न जाता उद्योग, व्यापार, सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक आदी वेगवेगळ्या क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि साक्षपणे कार्य करता आले त्याला प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणे काम करण्याची आपली भूमिका कारणीभूत ठरली, असे श्री. मानसिह पवार या प्रसंगी म्हणाले. या साऱ्या प्रवासात अनेक सुहृदांची साथ लाभली. आपल्या संपूर्ण प्रवासात मोलाची साथ देणाऱ्या सौ. संजीवनी यांचाही खूप मोलाचा सहभाग असल्याचं आवर्जून नमूद करीत त्यांनी हा सत्कार आम्ही दोघे मिळून स्वीकारत असल्याचे सांगितले
राजकारणात, समाजकारणात खूप मोठे काम केलेले आपले वडील बाळासाहेब पवार यांना असे सत्कार कधीच मिळाले नाहीत अशी खंत व्यक्त करीत त्यांनी त्यांच्यापेक्षा एक दशांश काम करूनही मला प्राप्त झालेला हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो असे नमूद केले. अधिक चांगले काम करण्यासाठी असे पुरस्कार प्रेरणादायी ठरतात त्यामुळे असेच कार्य करण्यास मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र चेम्बरचे माजी अध्यक्ष राम भोगले तसेच रुपेश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी केले. अमित वैद्य यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रकल्प प्रमुख मुकुंद सांगवीकर यांनी पुरस्काराची पार्श्वभूमी विशद केली. मिलिंद सेवलीकर यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सूरज डुमणे यांनी केले तर सचिव समीर कानडखेडकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शाह, तनसुख झांबड, गोपाल पटेल यांच्यासह क्लबचे सुनील बागूल, प्रकाश मालखरे विविध क्षेत्रातील व्यक्ती होत्या.