नांदेड शहरातील तिघांना 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड

नांदेड ,१५ जून /प्रतिनिधी:-  हिंदुत्त्ववादी संघटनेच्या नेत्यांची हत्या करून दंगल घडवण्याच्या उद्देशाने अटक करण्यात आलेल्या नांदेड शहरातील तिघांना 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड मुंबईच्या विशेष न्यायालयाने ठोठावण्यात आलेला आहे. या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

सन 2012 मध्ये नांदेडचे काही तरुण आतंकवादी संघटनेशी जोडल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. याप्रकरणी नांदेडच्या 5 तरुणांना अटक करण्यात आली होती. दहशतवादी कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अक्रम मो. अखबर बागवान (रा. इस्लामपुरा), मोहम्मद मुजम्मील अ. गणी (रा. ताजनगर), मो. सादिक मो फारुख (रा. कुंभारटेकडी), मो. इरफान मो. गौस (रा. इकबालनगर) व मोहम्मद इलियास अकबर बागवान (रा. इस्लामपुरा) या पाच जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी मो. अक्रम हा परदेशातून प्रशिक्षण घेऊन आला होता. दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालिन पोलीस अधीक्षक नविनचंद्र रेड्डी हे तपास करत असताना अनेक बाबींचा उलगडा झाला. त्यानंतर हे प्रकरण एन.आय.कडे गेले. मुंबईच्या काळाचौकी येथील विशेष न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. या प्रकरणात सुनावणी झाली. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज न्यायालयाने मो. अक्रम, मो. मुजम्मील, मो. सादिक या तिघांना 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला. तसेच ठोस पुरावा नसल्याने मो. इरफान व मो. इलियास या दोघांची निर्दोष मुक्तता केली. 

या पाच जणांना अटक केल्यानंतर नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अनेकांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईचा निषेध केला होता. या पाच जणांच्या अटकेनंतरच नांदेडमध्ये एमआयएम संघटनेचा उदय झाला होता.