हज यात्रेला पाठविण्‍याचा बहाणा करुन कुटुंबाला  तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा,ट्रॅव्हल्सचा मालकाला अटक 

औरंगाबाद,१५ जून /प्रतिनिधी:-

हज यात्रेला पाठविण्‍याचा बहाणा करुन कुटुंबाला  तब्बल १३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी अलबशीर टुर्स अँड  ट्रॅव्‍हल्सच्‍या मालकाला क्रांतीचौक पोलिसांनी मंगळवारी दि.१५ पहाटे अटक केली. अब्बास अली वाहीद अली हाश्‍मी (३८, रा. चांदमारी, नंदनवन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.

या प्रकरणात सय्यद जमालोद्दीन गफ्फार सय्यद अब्दुल गफ्फार (३१, रा. पंढरपुर एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, सन २०१७ मध्‍ये फिर्यादी, त्‍यांचे आई-वडील आणि भावाचे हजर यात्रेला जाण्‍याचे ठरले. मात्र त्‍यांचा हज कमिटी मार्फत नंबर लागला नाही. त्‍यावेळी फिर्यादीचा मित्र  अब्दुल हाजी याने पैठण गेट येथील अल बशीर टुर्स या ट्रॅव्‍हल्सचा मालक अब्बास अली हा हज यात्रेला घेवून जातो असे सांगितले. त्‍यानूसार फिर्यादीने अब्बास अलीची भेट घेवून हज साठी लागणारी सर्व कागदपत्रे  दिली व प्रत्‍येकी दोन लाख ७० हजार देण्‍याचे ठरले. त्‍यानूसार फिर्यादीने आरोपीच्‍या बँक खात्‍यात पाच लाख १० हजार रुपये ट्रान्‍सफर केले, तसेच तीन लाख रुपये आरोपीच्‍या ऑफीसला नेऊन  दिले. फिर्यादीच्‍या ओळखीचे जफर पठाण याने देखील हज यात्रेसाठी आरोपीला पाच लाख ४० हजार रुपये दिले. तसेच आरोपीच्‍या इतर नातेवाईकांनी देखील हजयात्रेसाठी आरोपीला पैसे दिले.

आरोपीने फिर्यादीसह इतरांना २४ ऑगस्‍ट २०१७ ला हजयात्रेचे तिकिट बुक झाले असून सर्वजण मुंबईएअर पोर्टला या तेथेच व्हिसा देण्‍यात येईल असे सांगितले. त्‍यानूसार सर्व जण मुंबईला गेले असता आरोपीने उद्या तिकीट कन्फर्म होणार असल्याची माहिती. त्‍यामुळे सर्वजण मुंबईलाच थांबले. दुसऱ्या  दिवशी फिर्यादीने आरोपीशी संपर्क करण्‍याच प्रयत्‍न केला असता संपर्क झाला नाही. फिर्यादीने मुंबई एअर पोर्टला हजयात्रेच्‍या तिकीटाबाबत चौकशी केली तेव्‍हा आपली फसवणुक झाल्याचे फिर्यादीच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यता आला.

पोलिसांनी शोध आरोपीला अटक करुन आज न्‍यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी आरोपीने फिर्यादी व इतरांकडून घेतलेले पैसे हस्‍तगत करणे आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती जणांनी फसवणुक केली याचा तपास करणे आहे. आरोपीने बनावट व्हिसा तयार केल्याचे तपासात समोर आले असून आरोपीने बनावट व्हिसा कोठे तयार केला तसेच आरोपीचे आणाखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.