अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍यावर अत्‍याचार,आरोपी अटकेत 

औरंगाबाद,१५ जून /प्रतिनिधी:-लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्‍यावर अत्‍याचार करणाऱ्या  तरुणाच्‍या  सोमवारी दि.१४ सायंकाळी अजिंठा पोलिसांनी औरंगाबाद मध्‍यवर्ती बसस्‍थानकात मुसक्या आवळल्या. आकाश दिलीप दांडगे (२१, रा. ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश विशेष जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी मंगळवारी दि.१५ दिले.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १२ जून रोजी सांयकाळी पाच वाजेच्‍या सुमारास पीडिता ही वहिणीच्‍या घरी जाऊन येते असे सांगून घरातून गेली होती. रात्र झाली तरी पीडिता घरी न परतल्याने फिर्यादी व तिच्‍या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. या प्रकरणात अजिंठा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना अजिंठा पोलिसांनी औरंगाबाद मध्‍यवर्ती बसस्‍थानकातून आरोपीला अटक केली तर पीडितेला ताब्यात घेतले.

पीडितेने जबाब दिला की, आरोपी व तिच्‍यात सातवी पासून प्रेमसंबंध आहेत. १२ जून रोजी सायंकाळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवर फुलंब्री येथे पळवून नेले. तेथे सर्व दुकाने बंद असल्याने ते बस स्‍थानका जवळील एका पत्र्याच्‍या शेड मध्‍ये थांबले. तेथेच आरोपीने तिच्‍यावर अत्‍याचार केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ते दोघे दुचाकीवर औरंगाबाद मध्‍यवर्ती बसस्‍थानकावर आले. तेथुन ते रात्रीच्‍या बसने मुंबईला जाणार होते, त्‍यासाठी आरोपीने तिकीट देखील काढले होते. दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास बसस्‍थानकावर आकाशचे काका भेटले. त्‍यांनी आकाशकडे विचारणा केली असता त्‍याने मुंबईला पळून चालल्याचे सांगितले. आकाशच्‍या काकांनी ही माहिती अजिंठा पोलिसांना दिली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आहे. गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास बाकी असल्‍याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.