नांदेडमध्ये अपघात ,दोन ठार

मृतांमध्ये पत्रकार प्रशांत माळगे यांचा समावेश

नांदेड ,१५ जून /प्रतिनिधी:-  भरधाव वेगात जाणार्‍या दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याने दोघे जण ठार झाले. मृतांमध्ये पत्रकार प्रशांत माळगे यांचा समावेश आहे. 

हाणेगाव येथील पत्रकार प्रशांत एकनाथ माळगे हे सहकारी बाळासाहेब आडेकर  यांच्यासोबत कुंडली येथे कामानिमित्त जात होते. हाणेगाव-वझर रस्त्यावर एकंबेकर महाविद्यालयाच्या समोर विरुद्ध दिशेने भरधाव येणार्‍या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात प्रशांत माळगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कोंडिबा रुपणर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अन्य एका घटनेत उदगीर तालुक्यातल्या हाळी येथील वर्‍हाडाचा टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात दोघे जण मृत्युमुखी पडले. आज सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. उदगीर तालुक्यातील हाळी येथील नरसिंग सोनकांबळे यांच्या मुलाचा विवाह बिलोली तालुक्यातल्या कारला येथे आयोजित करण्यात आला होता. वर्‍हाडाचा टेम्पो बिलोलीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात प्रशांत सूर्यवंशी (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.