पावणे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक

औरंगाबाद,१३ जून /प्रतिनिधी:- 

भर दुपारी घरातील सर्वजण झोपी गेलेले असताना घरात शिरुन कपाटातील मुकुंदवाडी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून चोरी केलेले दागिने पोलिसांनी जप्‍त केले आहेत.बाबासाहेब ऊर्फ बाब्‍या ऊर्फ सोनु मोहन भगुरे (२२, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव असून त्‍याला सोमवारपर्यंत दि.१४ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी रविवारी दि.१३ दिले.

मुकुंदवाडीतील सदाशिवनगरात राहणारे रमेश कोंडु तायडे (६२) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, ११ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्‍या सुमारास तायडे, त्‍यांची पत्‍नी व सुन असे तिघे झोपी गेले होते. संधी साधत चोरट्यांनी किचनच्‍या साईडच्‍या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करुन घरातील कपाटात पिशवीमध्‍ये ठेवलेले चार लाख ९५ हजार ४२३ रुपये किंमतीचे दागिने व एक हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. चार वाजेच्‍या सुमारास तायडे यांच्‍या पत्‍नीला जाग आली तेव्‍हा घरात चोरी झाल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांना गुप्‍त माहिती मिळाली की, तायडे यांच्‍या घरी एका अल्पवयीन मुलीने चोरी केली असून तिचा  सहकारी भगुरे नावाचा रिक्षा चालक आहे. याआधारे पोलिसांनी रामनगर कमानीजवळ सापळा रचून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर भगुरे याला अटक केली. त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली देत चोरलेला ऐवज रिक्षात ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्‍यानूसार पोलिसांनी चोरीचा ऐवज जप्‍त केला. तसेच आरोपी भगुरे याने चोरलेल्या ऐवजापैकी एक अंगठी शहागंज येथे विक्री केल्याची कबुली दिली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपीने शहागंज येथे विक्री केलेली अंगठी जप्‍त करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा आणि आरोपीने आणखी कोठे चोरी केली आहे याचा तपास करणे असल्‍याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.