नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित ; दोघांचा मृत्यू

नांदेड,१२ जून /प्रतिनिधी:- करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असून आज दोघांचा मृत्यू झाला तर 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यात मे महिन्यात करोनाने अक्षरश: थैमान घातले होते, परंतु गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. आज अर्धापूर येथील इंदिरा नगर मध्ये राहणार्‍या 65 वर्षीय महिलेचा तर पाटबंधारे नगर परिसरातील एका 54 वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आज एकूण 2 हजार 774 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात 529 जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 897 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. 8 हजार 798 जणांनी करोनावर मात केली. उपचारा दरम्यान बाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.73 इतकी आहे.