नांदेडमध्ये १५ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरु होणार 

नांदेड,१२ जून /प्रतिनिधी:-  गेल्या चौदा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा 15 जून पासून विद्यार्थ्यांविना सुरू होणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर 19 मार्च 2020 पासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. करोनाबाधितांची संख्या वाढत गेल्यानंतर राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण दिले, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणांमुळे अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळा पहावयासच मिळाली नाही.

——————————————————————————–

शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. अनेक शाळांचे अभिलेखे पूर्ण झाले आहेत. अनेक शाळांनी परीक्षा घेऊन निकालही तयार ठेवला आहे. विद्यार्थ्यांविना शाळेत जाऊन काय करावे? असा प्रश्न आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेत विद्यार्थ्यांना जास्त धोका असल्याने शाळा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होती याबाबत साशंकता आहे. राज्य शासनाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा.

– बाबूराव काटे, सहशिक्षक, नांदेड.

—————————————————————————-

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोणत्याही परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गासाठी पात्र ठरवावे असे आदेश दिले होते. अनेक शाळांनी मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पदोन्नत केले. करोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना जास्त धोका असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी शिक्षकांना मात्र 15 पासून शाळांमध्ये 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नियोजन, ऑनलाइन शिक्षण, वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने आज हे आदेश जारी करताना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर, हात धुण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याची सूचना केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नका असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या चौदा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांशिवाय शाळेत जाऊन काय करावे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.