अर्ली टेस्ट, अर्ली आयसोलेशन व ट्रीटमेंटच्या जोरावर रांजणी गाव केले कोरोनामुक्त

कोरोनामुक्तगावाच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाचे लाभले मोठे सहकार्य

May be an image of one or more people, people sitting and people standing

जालना, ,१२ जून /प्रतिनिधी:- राजंणी या गावात शासन व प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचना तसेच अर्ली टेस्ट, अर्ली आयसोलेशन व अर्ली ट्रीटमेंट या त्रीसुत्री बरोबरच मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन या बाबींचा प्रभावीपणे वापर केल्यामुळेच आमचे गाव कोरोनामुक्त झाले असुन या त्रीसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब करत भविष्यात कोरोनाचा शिरकाव गावात होऊ देणार नसल्याचा विश्वास सरपंच अमोल गोपाळराव देशमुख यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी आज राज्यातील अमरावती, नागपुर आणि औरंगाबाद विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी सरपंच अमोल देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

या संवादामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पोपटराव पवार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते तर जालना येथुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, सरपंच जयपुर तांडा ता. मंठा श्रीमती डॉ. स्वाती दत्तात्रय काकडे,सरपंच जयदेववाडी ता. भोकरदन, सुधाकर संतोषराव उदरभरे आणि सरपंच जांबरुम ता. मंठा विनोद मोतीराम जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच अमोल देशमुख यांच्यासह राज्यात ‘कोरोना मुक्त गाव’ मोहीम प्रभावीपणे राबवित असलेल्या सरपंचांच्या कामाचे कौतुक करत गावे कोरोनामुक्त करण्यासाठी गावोगावी अभिनव अशा कल्पना राबविण्यात येत असुन या कल्पनांचा उपयोग संपुर्ण राज्यातील गावांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगत कोरोनामुक्तीची चळवळ गावोगावी निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गाव, वसाहतीमध्ये टीम्स तयार करण्यात येऊन नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यासारखी काही लक्षणे आहेत का याची पहाणी केली पाहिजे. राज्यातील गावे कोरोनामुक्त झाली तरच राज्य व पर्यायाने देश कोरोनामुक्त होणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आजघडीला कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर धोका अजुन कायम असुन गाफील राहु नका. आपल्या गावामध्ये कोरोनाला येऊ द्यायचे नाही या ठाम निर्धार करत कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतराचे कटाक्षाने पालन करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

सरपंच अमोल देशमुख म्हणाले, घनसावंगी तालुक्यातील रांजणीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गावातील कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन नागरिकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी, सर्दी, खोकला आदी लक्षणांची तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे लोरिस्क व हायरिस्क असे वर्गीकरण करुन त्याप्रमाणे आरटीपीसीआर व अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या. कोरोनाबाधित रुग्णांचे तातडीने विलगीकरण व्हावे यादृष्टीने गावातच 50 बेडची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येऊन त्याठिकाणी नागरिकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

ग्रामपंचायतीच्यावतीने गावाच्या संपुर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार, दुकाने बंद करण्याबरोबरच गावाबाहेर चेकपोस्ट स्थापन करण्यात येऊन तपासणीनंतरच गावामध्ये नागरिकांना प्रवेश देण्यात आला. गावामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आल्याचे श्री देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले. प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, अशा सेविका, अंगणवाडी सेविका, गावस्तरीय विविध पथके तसेच गावातील नागरिक यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळेच आमचे गाव कोरोनामुक्त झाले असुन शासनाने नुकतेच घोषित केलेल्या कोरोनामुक्त गाव पुरस्कार स्पर्धेमध्ये रांजणी या गावाचे उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला असल्याचेही सरपंच श्री देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले.