‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत निर्बंध कमी झाले असले तरी सावधानता आवश्यक – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, ११ जून /प्रतिनिधी:-  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या  लाटेचा प्रभाव कमी झाली असला तरी कोरोना नाहीसा  झालेला नाही.  ‘ब्रेक दी चेन’ मोहीमे अंतर्गत  नियमात शिथिलता आलेली असल्याने  जनतेने अधिक सावधानता बाळगणे आवश्यक  असून शासकीय यंत्रणांनी अधिक सज्ज राहून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिक सजगतेने काम करावे अशा सूचना उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना आज येथे दिल्या.

May be an image of 2 people, people sitting and people standing

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री श्री.देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

May be an image of one or more people, people sitting, people standing and indoor

लॉकडाऊनच्या संदर्भात निर्बंध शिथील झाले असले तरी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून गर्दी होणार नाही याची काळजी घेत नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन करत श्री.देसाई म्हणाले की, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरची स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच लसीकरण मोहीम अधिक सक्रीय करत दररोज किमान 50 हजार ते 1 लाख लसीकरण झाले पाहिजे, असे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठरवून त्या दिशेने नियोजन केल्यास भविष्यातील आरोग्य विभागावरचा ताण नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि म्हणूनच सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्वी केल्याप्रमाणे आताही समन्वयाने काम करण्याच्या सूचना श्री.देसाई यांनी दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या लशींच्या प्रमाणात 92% लसीकरण करण्यात आले असून 138 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 96% पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून आतापर्यंत 12 लाख 6 हजार 495 जणांचे आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगून श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यात सात हजार खाटा उपलब्ध असून त्यात ऑक्सिजनच्या 3 हजार 230 खाटा, व्हेंटिलेटरच्या 552 खाटा उपलब्ध आहेत. 360 ॲम्ब्युलन्स कार्यान्वित असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून ऑक्सिजन निर्मिती देखील करण्यात येत आहे. 11 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्याकरिता आठ ऑक्सिजन प्लान्ट पैकी काही ऑक्सिजन प्लान्ट कार्यन्वित करण्यात आले असून काही प्लान्ट येत्या काही दिवसात सुरू करण्यात येतील अशी माहिती देत श्री.चव्हाण यांनी लसीकरण व्यवस्थापन, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता, शहरात टाळेबंदीदरम्यान हॉटेल्स आणि मद्यविक्रीची दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.