कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी- पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,११ जून /प्रतिनिधी:- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने टीम वर्कच्या सहाय्याने नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कौतुक तर आहेच पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सर्व यंत्रणा यामध्ये लसीकरण, उपलब्ध खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी असे ‍निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या कोरोना संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले.

May be an image of one or more people, people standing, people sitting and indoor

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ.भागतव कराड, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, आदींची उपस्थिती होती.

May be an image of one or more people, people standing, people sitting and indoor

यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत लोकांची गर्दी होईल अशा ठिकाणी प्रतिबंध आणि काही बंधने त्याचप्रमाणे मास्क वापरण्याबाबत सूचनांसह ‘ब्रेक द चेनचे’ पालन करुन रुग्णसंख्या वाढणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर त्याचप्रमाणे प्रशिक्षित आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना लसीकरण करुन घेतलेले प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरणा करण्यामध्ये वाढ होईल. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचा लसीकरणामध्ये आतापर्यंत महत्वपूर्ण योगदान राहिले असून यापुढेही त्यांच्या सहकार्याने लसीकरण पूर्ण करण्याबाबत आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे.

खासदार इम्तियाज जलील यांनी म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील दंतरोग चिकित्सक यांची रिक्त पदे भरावीत जेणे करुन या आजारावरील उपचार वेळेत उपलब्ध होऊन रुग्णांमध्ये घट होईल असे मत मांडले.

बालकांच्या कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना म्हणून व्हेंटिलेटर वापराचे प्रशिक्षण असलेले डॉक्टर यांचे पथक सज्ज ठेवावे. त्याचप्रमाणे मास्क वापराबाबत अंमलबजावणी होते की नाही याबाबत प्रशासनाने चोख जबाबदारी पार पाडावी. कोरोना कालावधीमध्ये ओराग्य यंत्रणेने तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा उपलब्ध करुन घेतल्या होत्या या सेवा पूर्ववत सूरु ठेवण्याबाबतची मागणी खासदार डॉ.भागवत कराड यांनी यावेळी केली. 

 आमदार हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, मास्क जर वापरले नाही तर आजची गर्दीची परिस्थिती  लक्षात घेता कोरोनाची तिसरी लाट अधिक प्रभावी ठरू शकते यामुळे पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्याबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली.

प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी केलेले काम कौतुकास पात्र असून यापुढेही लग्न समारंभ, अंत्यविधी, बाजारपेठा येथील गर्दी नियंत्रणात ठेवून सभांना मर्यादित लोकसंख्येच्या उपस्थितीची परवानगी द्यावी अशी सूचना आमदार अंबादास दानवे यांनी केली.

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी गंगापूर व वैजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास एम.डी.मेडिसिन डॉक्टरांची उपलब्धता व लहान मुलांसाठी  विशेष कक्ष उभारण्याबाबतची मागणी केली.

बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा, उपलब्ध खाटांची संख्या, ऑक्सिजनचा पुरवठा आणि साठा, जिल्ह्यात झालेले लसीकरण, म्युकरमायकोसिसबाबतची सद्यपरिस्थिती, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजन याची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.