म्हाडामार्फत खासगी विकासकांबरोबर संयुक्त भागीदारी प्रकल्प राबवून परवडणाऱ्या सदनिकांच्या उभारणीवर भर-जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद मंडळातील ८६४ सदनिका वितरणासाठी ऑनलाईन सोडत

मुंबई, दि. १० : – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहबांधणीत यशस्वी प्रयोग केले आहेत. म्हाडाच्या पारदर्शक, विश्वासार्ह संगणकीय सोडतीमुळे सर्वसामान्य नागरिक गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाचा पर्याय प्राधान्याने निवडत आहेत. म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहकार्याने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

          म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाईन सदनिका सोडत गृहनिर्माणमंत्री श्री. आव्हाड यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. त्यावेळी श्री. आव्हाड बोलत होते.

          श्री. आव्हाड यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री  सुभाष देसाई , गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती  विनोद घोसाळकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन सहभागी झाले.

         श्री. आव्हाड म्हणाले, म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे चिखलठाणा, नक्षत्रवाडी व ऑरिक सिटी  येथे ५ हजार ५०० परवडणाऱ्या सदनिकांचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच या तीनही ठिकाणी गृहनिर्मिती प्रकल्पाला प्रारंभ केला जाणार आहे. या माध्यमातून औरंगाबाद वासियांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास श्री. आव्हाड यांनी व्यक्त केला.

           यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणाली सोबतच, दर्जेदार घरे व उत्कृष्ट  सदनिका वितरण प्रक्रिया या सर्व बाबींनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जोपासला आहे. त्यामुळेच औरंगाबाद  मंडळाच्या ८६४ सदनिकांकरिता ८ हजार २२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदनिका सोडतीला  मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता म्हाडाची घरे खऱ्या अर्थाने परवडणारी असल्याचे द्योतक आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अधिक परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाळुंज (तिसगाव) येथे म्हाडाला १३ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. म्हाडाच्या सोडतीला मिळालेला प्रतिसाद बघता औरंगाबाद मंडळाने भविष्यात अधिक गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

          गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळवून देण्यास गृहनिर्माण विभाग कटिबद्ध आहे. शासनाच्या माध्यमातून गृहनिर्मितीकरिता जागा उपलब्ध झाल्यास सर्वांसाठी घरे या योजनेचे उद्दिष्ट सफल होऊ शकेल. परवडणाऱ्या दरात हक्काची दर्जेदार घरे निर्माण करणे ही म्हाडाची सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकीच आहे, असे सांगताना श्री. पाटील यांनी सर्व विजेत्यांना नवीन घराकरिता शुभेच्छा दिल्या.

         कोविड -१९ महामारीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता व शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास असलेल्या निर्बंधास अनुसरून आजचा सोडतीचा कार्यक्रम झाला. वेबकास्टिंगच्या माध्यमातून सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण घरबसल्या बघण्याची सुविधा म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात आली. अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर थेट प्रक्षेपणाची लिंक म्हाडातर्फे पाठविण्यात आली होती.

         आज झालेल्या सोडतीसाठी दि. १ मार्च, २०२१ रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणे व स्वीकृतीला प्रारंभ झाला. त्यास अनुसरून एकूण ८ हजार २२६ अर्जदारांचे अर्ज प्राप्त झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील अंशतः व हिंगोली येथील पूर्ण टाळेबंदीमुळे नागरिकांची झालेली अडचण विचारात घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी, नोंदणीकृत अर्जदारांना सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, अनामत रकमेची ऑनलाईन स्वीकृती, बँकेत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरणा या कामासाठी मुदत वाढविण्यात आली होती.

          सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS)  पडेगाव (जि. औरंगाबाद) येथे ३६८ सदनिका, हिंगोली येथे १३२ सदनिकांचा, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ०७ सदनिकांचा समावेश होता. अल्प उत्पन्न गटाकरिता देवळाई (जि. औरंगाबाद) येथील १२ सदनिका, शहानुरवाडी (औरंगाबाद) येथे २८ सदनिका, सातारा (औरंगाबाद) येथे ७६ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका व हर्सूल (जि. औरंगाबाद) येथील ०२ सदनिकांचा सोडतीत समावेश होता. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी हिंगोली येथे ४८ सदनिका तर मध्यम उत्पन्न गटासाठी पडेगाव (जि. औरंगाबाद) येथे १६८ सदनिका विक्रीसाठी सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या.

           म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे तसेच औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयातील सूचना फलकावरही सदर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

           प्रतीक्षा यादीवरील अर्जदार व अयशस्वी अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर दि. २४ जून, २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे, असे औरंगाबाद मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.