आसेगाव येथील सरंपच पद रद्द ,निर्वाचन अधिकारी यांच्यावर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद ,१० जून /प्रतिनिधी:-  गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायत येथील सरंपच पद जिल्हाधिकाऱ्यांद्वारा रद्द करण्यात आले असून तत्कालीन निर्वाचन अधिकारी यांच्यावर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायतीची सरंपचपदाची जागा ही एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होती. तत्कालीन निर्वाचन अधिकारी डी.जी.पगार होते. याठिकाणी सविता राजगुरु आणि गिरीजा बागूल या दोन सदस्या एससी महिला प्रवर्गातील सदस्या होत्या. वास्तविक सविता राजगुरु यांचा मूळ प्रवर्ग हा एससी आहे. मात्र, त्या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या या कारणाने निर्वाचन अधिकारी श्री.पगार यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द केले.तसेच आठ फेब्रुवारी 2021 तारखेची विशेष सभा तहकूब करण्यात आली आणि 9 फेब्रुवारीला सविता राजगुरु यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने दुपारी २.४५ वा. सविता राजगुरु यांचे निर्देशन पत्र स्वीकारण्यात यावे,असे आदेश दिले होते. सदरच्या आदेशाबाबत निर्वाचन अधिकारी श्री. पगार यांना संबंधित सरकारी अभियोक्ता तसेच श्रीमती राजगुरु आणि गंगापूर तहसीलदार यांनी कळविले होते. मात्र तरी सुद्धा साडेतीन वाजता बैठक पुन्हा सुरु झाल्यावर उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही श्री.पगार यांनी श्रीमती राजगुरु यांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले नाही. तसेच गिरीजा बागुल यांना बिनविरोध सरपंच घोषित केले.
त्यामुळे सविता राजगुरु यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सदर निवडणुकीच्या वैधतेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३३(५) अन्वये विवाद उपस्थित केला. सदर प्रकरणात सर्व संबंधितांची सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर सरपंच पदाच्या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी श्री.पगार यांनी गैरप्रकार केल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने सदर निवडणुकीची प्रक्रिया अवैध ठरवली असून सदर ग्राम पंचायतीचे सरपंच रिक्त घोषित केले आहे. तसेच तहसीलदार गंगापूर यांना सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याचे आदेश दिले आहेत.तसेच जिल्हाधिकारी यांनी संबंधित निर्वाचन अधिकारी श्री.पगार यांनी सदर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्यामुळे यांच्यावर खातेनिहाय कारवाईचे निर्देश दिले आहेत.