लातूर उच्चतम कृषी बाजार समितीकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेसाठी दहा व्हेंटिलेटरची उपलब्धता

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना या व्हेंटिलेटर चा लाभ तात्काळ उपलब्ध करून द्यावा

हे व्हेंटिलेटर 0 ते 100 वर्षे वयोगटातील रुग्णांना उपयोगी पडणार

लातूर, दि.9(जिमाका):- कोविड-19 या जागतिक महाभारी च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे त्यांच्या नफ्यातील 10 ते 25 टक्के निधी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरावा व सदरची उपकरणे जिल्हा प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती कडून खरेदी करण्यात आलेल्या दहा व्हेंटिलेटर लोकार्पण समारंभात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, मनोज पाटील, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्‍मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, पणन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोविड च्या प्रतिबंधासाठी दहा व्हेंटीलेटर खरेदी करून ते प्रशासनाला सुपूर्द करणारी लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात पहिली आहे. या शासन निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ही covid-19 या साथ रोगाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे देण्यात येत असलेले हे 10 व्हेंटीलेटर जन्मजात बालकापासून ते शंभर वर्षे वयाच्या नागरिकावर उपचारांसाठी उपयोगात आणली जाऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सामान्य व गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे व वैद्यकीय विज्ञान संस्थेने त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांना गरज असेल तर तात्काळ वेंटीलेटर सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

लातूर जिल्ह्यासह राज्य व संपूर्ण देशात ही करुणाकोरोना महामारी ची  दुसरी लाट ओसरत आहे. या दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने नियोजन बद्ध केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्यात एकही अनुचित घटना घडलेली नाही. याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व प्रशासनाचे कौतुक केले. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.

तसेच जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातील शंभर टक्के नागरिकाचे लसीकरण होत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना चे तंतोतंत पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून लातूर जिल्ह्याला लसीचा नियमितपणे  पुरवठा झाला तर प्रशासनाने शंभर दिवसात जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केलेले दिसून येत आहे. तरी लसीचा तुटवडा असल्याने पुढील काळात वेळेत लस मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार असून किमान एका वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे लातूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या नफ्यातील 10 ते 25 टक्के हिस्सा आरोग्य उपकरणे व अन्य मदतीसाठी द्यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात शंभर बेडचा आय सी यु वॉर्ड उभारला जात असून प्रत्येक 10 बेड मागे तीन व्हेंटिलेटर याप्रमाणे प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या  अनुषंगाने जिल्हा प्रशासन तयार आहे परंतु ही लाट आपल्याकडे येऊ नये यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले.

राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना त्यांच्या नफ्यातील 10 ते 25 टक्के रक्कम कोविड साठी खर्च करण्यास परवानगी दिली आहे त्या अनुषंगाने प्रथम कोविड सेन्टर निर्माण केले जाणार होते परंतु ते शक्य नसल्याने माननीय पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाने  कोविड  सेंटर ऐवजी वैद्यकीय उपकरणे व अन्य मदत देण्यात यावी असा शासन निर्णयात बदल करून घेतला व त्या अनुषंगाने लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा वेंटीलेटर ची खरेदी केली असून हे सर्व व्हेंटीलेटर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे पुढील वापरासाठी  सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ललित भाई शहा यांनी दिली.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने सन 2020-21 मधील त्यांच्या नफ्यातून दहा वेंटीलेटर ची खरेदी केली व सदरील वेंटीलेटर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.