चाकूरच्या पत्रकारांचे सामाजिक कार्य ,आम्ही चाकूरकर ग्रुपने लोकसहभागातून तयार केली रुग्णवाहिका 

चाकूर ,९जून /प्रतिनिधी :-चाकूरच्या पत्रकारांनी कोव्हिड महामारीच्या काळात केलेले सामाजिक कार्य संबंध राज्यासाठी पथदर्शी आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात केलेले कार्य योद्ध्यांचे  आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी चाकूर येथील स्वामी विवेकानंद चौकात आम्ही चाकूरकर या व्हाट्सअँप ग्रुप च्या वतीने आयोजित लोकसहभागातून घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात केले.

May be an image of 1 person and standing


          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा  तथा लाईफ केअर रिसर्च सेंटरच्या चेअरमन डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, सीमा सुरक्षा दलाचे उप कमांडन्ट श्रीधर निकम, सहायक कमांडन्ट डॉ.विनोद तांदळे, सहाय्यक कमांडन्ट डॉ. चेतन पखाले, जेष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर उपस्थित होते. वृक्षारोपण करून रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. यावेळी रुग्णवाहिका घेण्यासाठी सहकार्य केलेल्या दातृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

May be an image of 1 person and standing


        लातूर जिल्ह्यातील लॉकडाउन उठवण्यात आला आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. पण जनतेने आपल्याला आता कोरोना होणार नाही असा गैरसमाज करून घेऊ नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. तर जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकारांनी आम्ही चाकूरकर ग्रुप च्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची पेरणीच्या व रासणीच्या वेळ होणारी भांडणे होणार नाहीत यासाठी काम करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व वरिष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी मार्गदर्शन केले.

May be an image of one or more people and people standing


         शहरात खाजगी रुग्णवाहिका नसल्यामुळे सिटीस्कॅन व इतर कारणासाठी लातुर व इतर ठिकाणी जाण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात आल्याने रूग्णांना लवकर उपचार मिळावेत व सोय व्हावी यासाठी आम्ही चाकूरकर ग्रुपने पुढाकार घेतला. माझी रूग्णवाहीका हा उपक्रम राबवत लोकसहभागातून रूग्णवाहीका घेण्यासाठी समाज माध्यमाद्वारे मदतीचे आवाहन केले. त्यास समाजातील दानशूर व्यक्तीं, संस्थाकडुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने चाकूर शहरात सर्वसामान्यांसाठी हक्काची रूग्णवाहीका उपलब्ध झाली आहे.    आम्ही चाकूरकर ग्रुप चे प्रमुख प्रशांत शेटे यांनी प्रास्ताविक केले तर गणेश स्वामी यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले. पत्रकार बचत गटाचे अध्यक्ष संगमेश्वर जनगावे, विनोद नीला, सुधाकर हेमनर, सदाशिव मोरे, विकास स्वामी, संग्राम वाघमारे, शिवदर्शन स्वामी, वर्धमान कांबळे यांनी रुग्णवाहिका घेण्यासाठी पुढाकार घेतला.

पावसात भिजत केले भाषण
————————–
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचे भाषण सुरु असताना अचानकपणे पाऊस सुरु झाला. पावसात भिजत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाषण केले. पावसात भिजत भाषण करत असलेल्या क्षणांचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपल्या मोबाईल वर चित्रीकरण केले. यावेळी उपस्थितांना मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेबांनी पावसात भिजत केलेल्या भाषणाची आठवण झाली.