आरटीपीसीआर तपासणी, लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

  •  स्तर (Level) एक अबाधित ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
  •  व्यापाऱ्यांनी सात दिवसांत चाचणी करून घेणे बंधनकारक
  •  ग्रामीण भागात तपासणी नाके कार्यान्वित
  •  दर गुरूवारी जिल्हा प्रशासनाचा आढावा

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:-  कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये. शहराचा स्तर (Level) एक अबाधित रहावा. ग्रामीणचा स्तर (Level)  तीनवरून एक करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. निर्बंधातील शिथिलतेमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरटीपीसीआर चाचणी, लसीकरण अधिक करण्यावर प्रशासनाचा भर असेल. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

Displaying IMG_20210607_133754.jpg

जिल्हाधिकारी कार्याालयातील सभागृहात कोविड-19 आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांची उपस्थिती होती.

मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, फेसशिल्डचा वापर करणे आदी नियमांचे कसोशीने पालन करावे. शहरातील पॉझिटिव्हीटी रेट कमी जरी होत असला तरी मनपाने जनजागृतीवर भर द्यावा. डिजिटल फलकांव्दारे प्रचार-प्रसार करावा. विविध प्रचार साहित्यांचा अवलंब करावा. तर ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी वेळेसह इतर नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा. उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या निर्बंधाचे पालन होण्यासाठी सातत्याने जनजागृतीवर लक्ष केंद्रित करावे. हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी 50 टक्के क्षमतेने परवानगी दिली आहे. त्याकरिता हॉटेल चालक, मालकांनी दर्शनी भागात आसन क्षमता, कर्मचारी, त्यांचे लसीकरण याबाबत सविस्तर अद्यावत माहिती लावावी, अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कोविड -19 तपासणी करणे बंधनकारक आहे. आजपासून सात दिवसानंतर सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्यासह कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी करावी. कोविड-19 टेस्टिंग कीट जिल्ह्यात मुबलक प्रमाणात आहेत. तर शहरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे दररोज जवळपास साडे तीन हजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील प्रयोगशाळेत जवळपास अडीच हजार आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाच्या मोबाईल व्हॅनद्वारे साधारणत: अडीच ते तीन हजार अशा जवळपास साडे आठ हजार चाचण्यांची जिल्ह्यातील क्षमता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणावरही अधिक लक्ष केंद्रित करावे. ज्यांना शक्य आहे अशा नागरिकांनी खासगी इस्पितळातून लशींचा डोस घ्यावा. सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी प्रशासनामार्फत दर गुरुवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्यात येतील. त्यामुळे नागरिकांची कोविड-19 चा संसर्ग वाढू नये. जिल्ह्यातील स्तरात सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने मस्कचा वापर, वारंवार हात धुणे, आरटीपीसीआर चाचणी, पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजन निर्मिती क्षमता, लसीकरण, आदी बाबींवरही श्री. चव्हाण यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी शहरातील कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा. शहर सध्या स्तर (Level)  एकवर आहे. ते अबाधितपणे एकवर रहावे यासाठी लोकांनीच स्वयंशिस्त पाळावी. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा, असे सांगितले.

ग्रामीण भागात 500 गावांमध्ये कोविड-19 रूग्ण आहेत. या ॲक्टिव्ह गावांच्या संख्येत घट व्हावी. यासाठी ग्रामीण भागात अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागाच्या हद्दीत शहराप्रमाणेच तपासणी नाके कार्यान्वित असतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले म्हणाले.

उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, रिता मैत्रेवार, अप्पासाहेब शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.

‍                   श्रीमती पाडळकर, श्री. कुलकर्णी, श्री. शेळके यांनी आरोग्य यंत्रणेच्या कार्याबाबत माहिती दिली. बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांनीही लसीकरण वाढविण्याबाबत आरोग्य विभागास मार्गदर्शन केले.