छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी ‘शिवशक राजदंड स्वराज्यगुढी’ उभारणे हे माझे भाग्य – पालकमंत्री धनंजय मुंडे

‘शिवस्वराज्य दिन’ बीड जिल्ह्यात उत्साहात साजरा; पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उभारण्यात आली शिवस्वराज्य गुढी

बीड,६ जून /प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवस्वराज्य दिन साजरा होत असताना शिवशक राजदंड स्वराज्य गुढी माझ्या हस्ते उभारणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी राजा म्हणून इतिहासातील कर्तृत्व पिढ्यानपिढ्या साठी मार्गदर्शक असल्याचेही  श्री.मुंडे यांनी यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले.

शिवस्वराज्य दिन हा कार्यक्रम  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शिवकन्या ताई शिरसाट, आ. संदीप क्षीरसागर, समाज कल्याण सभापती श्री कल्याण आबुज, महिला व बालकल्याण सभापती यशोदा ताई जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी विक्रम सारूक, यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा  करण्यात येत आहे. यानिमित्त पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केले. त्यानंतर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन झाले. याप्रसंगी स्वराज्यध्वजास पालक मंत्री श्री मुंडे यांनी अभिवादन केले.

या शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून कोरोना आपत्तीच्या काळात कोड कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्धा अंगणवाडी सेविका यांच्या वारसांना पन्नास लक्ष रुपयांच्या अनुदानाचा धनादेश पालकमंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी मृतांचे वारस सचिन बाबासाहेब हजारे तसेच राजेंद्र रघुनाथ तांदळे यांनी हे धनादेश स्वीकारले.

याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतुन घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व घराची प्रतिकात्मक चावीचे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील घरकुल लाभार्थी जानकाबाई नवले पाली तालुका जिल्हा बीड,  आणि रमाई आवास योजना ग्रामीण चे घरकुल लाभार्थी श्री बाबासाहेब मुकुंदा जाधव यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.

कोरोना कालावधीत जिल्ह्यातील बचत गटांनी मास्क निर्मिती करून चांगले कार्य केल्याबद्दल सिमरन महिला बचत गट बीड आणि श्री साई महिला बचत गट घाटसावळी यांच्या सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 11 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स संच पालक मंत्री यांना सुपूर्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.