घर बळकावून कर्ज काढले ,चार आरोपींना अटक 

औरंगाबाद,५जून /प्रतिनिधी:-

घरावर कर्ज  काढून देतो म्हणत, घर बळकावत त्‍यावर कर्ज  घेऊन  फसवणूक करणाऱ्या  चौघांच्‍या  सिडको पोलिसांनी शुक्रवारी दि.४ जून रोजी सायंकाळी मुसक्या आवळल्‍या. चौघा आरोपींना सोमवार दि.७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी शनिवारी दि.५ जून रोजी दिले.

दिपक देविदास धनवटे (३४, रा. नवजीवन कॉलनी, एन-११ हडको), आनंद सिध्‍देश्र्वरराव उपाध्‍ये (३७, रा. राजलक्ष्‍मी रेसीडेन्‍सी, सातारा परिसर), लक्ष्‍मण जनार्दन फुन्‍ने (३६, रा. न्‍यू गजानन नगर, पुंडलिकनगर) आणि योगेश दिगंबर हिवाळे (३२, रा. भारत नगर, हडको कॉर्नर) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात माधुरी विक्रम भालेराव (३०, रा. नवजीवन कॉलनी, हडको) यांनी फिर्याद दिली. माधुरी यांच्‍या वडीलांचे १९९५ मध्‍ये निधन झाले. २०१३ मध्‍ये वडीलांचे नावे असलेले  नवजीवन कॉलनी येथील घर माधुरी यांच्‍या नावे झाले. माधुरी यांच्‍या कुटूंबाची हालाकीची परिस्‍थीती असल्याने त्‍यांनी अनेक लोकांकडून उसने पैसे घेतले होते. २०१६ मध्‍ये माधुरी यांच्‍या भावाचा मित्र  दिपक धनवटे याने परिस्‍थीतीचा फायदा घेत माधुरी यांना जैन फाउंडेशन कचनेर येथून घरावर लोन मिळवून देतो अशी थाप मारली. गरज असल्याने माधुरी यांनी देखील त्‍याला होकार दिला. त्‍यानंतर आरोपी दिपकने माधुरी यांना थापा मारुन कोऱ्या बॉण्‍ड पेपरवर आणि इतर  कागदपत्रांवर माधुरी यांच्‍या स्‍वाक्षऱ्या  घेतल्या. काही दिवसांनी आरोपीने माधुरी यांना सिडको कार्यालयातून परवानगी घ्‍यायची असल्याचे सांगत त्‍यांना सिडको कार्यालयात आणले व तेथे देखील कादगपत्रांवर स्वाक्षऱ्या  घेतल्या.

१ एप्रिल २०१६ रोजी आरोपी माधुरी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून गेला तेथे देखील आरोपीने कागदपत्रांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्षऱ्या  घेतल्या. १८ एप्रिल २०१६ रोजी दुपारी माधुरी यांना इक्वीटास फायनान्‍सस गारखेडा येथून अंकुश घुगे याने फोन केला व तुम्ही  राहत असलेले घर दिपक धनवटेचे आहे का, त्‍याने लोन साठी अर्ज केल्याचे सांगितले. माधुरी यांना संशय आल्याने त्‍यांनी इक्वीटास फायनान्‍सच कार्यालय गाठलं, मात्र त्‍यांना कोणीच माहिती  दिली नाही. त्‍याच दिवशी माधुरीने आरोपीला फोन करुन जाब विचारला असता, त्‍याने हे घर आता माझ्या नावावर आहे. घर पुन्‍हा तुमच्‍या नावे करायचे असल्यास आठ लाख रुपये द्या, अन्यथा घर दुसऱ्याला विक्री करतो असे सांगत, तुम्हाला कुठे जायचे जा अशी धमकी दिली. त्‍यावेळी माधुरी यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार दिली, मात्र त्‍यावर काही कारवाई झाली नाही.

नोव्‍हेंबर २०२० मध्‍य ए.यू स्‍मॉल फायनान्‍स बँकचे अधिकारी माधुरी यांच्‍या घरी आले व त्‍यांनी धनवटे याने घर तारण ठेवून आमच्‍या बँकेतून बिझनेस लोन उचलले असून त्‍याचे हप्‍ते थकल्याची माहिती दिली. त्‍यामुळे माधुरी या चौकशी साठी सदरील बँकेत गेल्या असता, दिपक धनवटे याने तारण ठेवलेल्‍या मालमत्तेची पाहणी न करता बँकेचे क्रेडीट मॅनेजर आनंद उपाध्‍ये, टेक्निकल ऑफीसर विक्रम गढेकर, सेल्स मॅनेजर लक्ष्‍मण फुन्‍ने आणि रिलेशनशिप मॅनेजर योगेश हिवाळे यांनी धनवटे याच्‍याशी संगनमत करुन खोटा पाहणी अहवाल सादर करुन धनवटे याला लोन मिळवून दिले. त्‍यानंतर माधुरी यांनी पुन्‍हा सिडको पोलिस ठाण्‍यात तक्रार अर्ज केला. चौकशी अंती आरोपींविरोधात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपी धनवटे याच्‍या कडून मुळ बॉण्‍ड पेपर आणि कागदपत्रे जप्‍त करणे आहे. ए.यू. स्‍मॉल बँकेच्‍या अटक कर्मचाऱ्यांनी पाठविलेला मुळ अहवाल आणि फोटो जप्‍त करणे आहे. गुन्‍ह्यात बँकेचे आणखी कोणी सहभागी आहेत का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.