पत्नीसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरून एकाचा खून,सहा तासात गुन्ह्याचा तपास

हिंगोली,५ जून / प्रद्युम्न गिरीकर

पत्नीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून पतीने साथीदाराच्या मदतीने एकाचा गळा आवळून खून करीत त्याचे प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला. हिंगोली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांमध्ये या गुन्ह्याचा शोध लावीत आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले आहे.


वारंगा ते आखाडा बाळापुर मार्गावर असलेल्या दाती पाटी नजीक शुक्रवारी स्कोडा गाडी क्रमांक एम एच 14 डी सी 70 75 मध्ये एका इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार पोलिसांना समजताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय व पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवीत घटनास्थळी तपासणी केली असता गाडीमध्ये दोन मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर मोबाईल मधील सिम कार्ड काढून ते दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकून तपासणी केली असता मयत व्यक्ती हा माणिकराव राजाराम राजेगोरे राहणार कलदगाव तालुका अर्धापूर, हल्ली मुक्काम विनायक नगर नांदेड हा असून त्याचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याचे समोर आले.
यानंतर गुन्हे शाखेचे पथक नांदेड येथे पोहोचून मयत राजेगोरे याच्या मित्र परिवाराकडे चौकशी करीत माहिती घेण्यात आली. दरम्यान सायबर सेलच्या माध्यमातून मयत व्यक्ती हा कोणा कोणाच्या संपर्कात होता याचीही माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कैलास चिलटेवार राहणार घोगरी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता पत्नी सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून साथीदाराच्या मदतीने माणिकराव याचा गळा आवळून खून केला व प्रेत ओळखू येऊ नये म्हणून डिझेल टाकून जाळल्याची कबुली कैलास याने दिली.
या प्रकरणी बाळापुर पोलिसात गुन्हा दाखल करीत आरोपी कैलास यास बाळापुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, विलास सोनवणे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, जयप्रकाश झाडे, आदी कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.