पर्यावरण संरक्षण जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

  • गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • टेकडीवर 6 हजार वृक्षांची होणार लागवड
  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यावरण संरक्षणाचा संदेश
Displaying 7.jfif

औरंगाबाद ,५ जून /प्रतिनिधी:-   

वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड आणि त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, असे सांगितले आहे.  यासाठी नागरिकांनी आवश्यकता असल्यासच इंधन वाहनाचा वापर करावा. तसेच विजेची, पाण्याची बचत करावी, अशा सुक्ष्म परंतु महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. या बाबींचा अवलंब करून पर्यावरण संरक्षण हाच जीवनाचा अविभाज्य भाग होण्यासाठी सर्वांनी आग्रही असावे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज व्यक्त केले.

Displaying 2.jfif

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे जिल्हा प्रशासनामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, इको बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पी. व्यंकटेश, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मुख्य वन संरक्षक एस.एम. गुजर आदींसह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात कोविड -19 च्या शिष्टाचाराचे पालन सर्वांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी शासनाकडून सातत्याने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यात येते. शासनामार्फतही विविध पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले जातात. ‘गोगाबाबा टेकडी हरीतकरण’ हा देखील त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जीवन आनंदी, निरोगी व निरामय जगण्यासाठी वृक्ष आपल्या जीवनात मोलाचे कार्य करतात. कोविड – 19 मध्ये ऑक्सिजनचे महत्त्व आपणास कळलेले आहे. मात्र,आता सुदृढ जीवन जगण्याची आशा करणाऱ्या माणसांसाठी गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमातून शहरवासीयांसाठी ऑक्सिजन हब तयार होईल, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.

पर्यावरण दिन केवळ एक दिवसच साजरा न करता तो आपल्या जीवनाचा भाग व्हावा. सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. व्यक्तीगत पातळीवर आपण पर्यावरणाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे मत पोलिस आयुक्त श्री. गुप्ता यांनी व्यक्त केले. तसेच आजच्या दिवशी पर्यावरणाला आपण त्याचे संरक्षण देण्याची प्रतिज्ञा करू, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात पर्यावरण वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जनतेला दिलेल्या पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा संदेशाने झाली. या शुभेच्छा संदेशात त्यांनी मागील काही वर्षात वातावरण बदलांमुळे कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळाचा तर कधी अवकाळी पावसाचा अशा विविध आपत्तींना आपणाला सामोरे जावे लागले. 2020 मध्ये या आपत्तीमध्ये शासनाने 13 हजार कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे. वातावरणातील बदलामुळे अशा आपत्तीतील परिणामांना मानवच जबाबदार आहे. परंतु आपण यावर नियंत्रण आणू शकतो. माझी वसुंधरा, सुंदर वसुंधरा याची जाणीव ठेवून आपण वागल्यास पर्यावरणाची जपवणूक होईल. यासाठी सर्वांचे सहकार्य असण्याबरोबरच सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर आपापल्या वाढदिवशी एखाद्या वृक्षाचे रोपन, करावे, पाण्याची बचत, विजेची बचत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प सर्वांनी करावा, असेही ते म्हणाले.

Displaying 5.jfif

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्या जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशानंतर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सपत्निक वृक्षारोपण करून ‘गोगाबाबा टेकडी हरीतकरण’ चा शुभारंभ केला. पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले, कर्नल व्यंकटेश आदींनीही वृक्षारोपन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी केले व शेवटी आभारही मानले.