नांदेड जिल्ह्यातील १६०४ खेड्यांपैकी १ हजार ४५० खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार !

नांदेड,, ४ जून / प्रतिनिधी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहोचला असता या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दक्षतेने पेलून जिल्ह्यातील 1 हजार 450 खेड्यांना कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बळ दिले. यात ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या त्रिसूत्रीचा गावपातळीवर अंमल व्हावा यासाठी भरीव योगदान राहिले आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व यंत्रणा पुर्ण सक्षमतेने कार्यरत राहिल्यामुळे जिल्ह्याला हे यश साध्य करता आले. कोरोनाचे आव्हान अजून संपले नसून खेड्यातील लोकांसह ग्रामपंचायतींनी गाफिल न राहता अधिक जबाबदारीने यापुढे दक्षता घेतली तर नांदेड जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण जिल्हा असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

May be an image of 1 person, sitting and indoor

कोरोनाच्या या दोन्ही लाटेत नांदेड जिल्ह्यातील एकुण 16 तालुक्यांमधील सुमारे 271 गावांनी आपल्या गावाच्या हद्दीत कोरोनाला शिरकाव करु दिला नाही. यात सर्वाधिक गावे किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील आहेत. येथील 77 खेड्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाला येऊ दिले नाही. याच्या खालोखाल हदगाव 42, कंधार 39, लोहा 22, भोकर 16, माहूर 17, मुदखेड 15, नांदेड 12, हिमायतनगर 9, देगलूर 7, अर्धापूर 4, धर्माबाद 4, उमरी 4, मुखेड 2 व बिलोली 1 अशी तालुक्यातील खेड्यांची संख्या आहे.

नायगाव तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने लसीकरणाच्याबाबतीत आपला अपूर्व ठसा उमटविला आहे. या गावात 45 वय वर्षे वयावरील 528 व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष निर्धारित केले होते. या दिलेल्या लक्षाची 100 टक्के पूर्ती करुन या खेड्याने लसीकरणाला नवा विश्वास दिला. भोकर तालुक्यातील भोसी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या आव्हानावर यशस्वी मात करता यावी यासाठी जे बाधित आले त्यांना गावातील शिवारात-शेतात विलगीकरण करुन त्या ठिकाणी सर्व सुविधा, औषधे उपलब्ध करुन दिली. यामुळे भोसी गावातील दुसऱ्या लाटेत 14 मार्च ते 12 मे या कालावधीत 119 बाधितांवर पोहचलेली संख्या खाली शुन्यावर आणण्यापर्यंत यश मिळविले. आजच्या घडिला भोसी गावात एकही बाधित नाही, हे विशेष.

ग्रामीण भागातील आरोग्याचे विशेषत: कोरोना आव्हानावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक खेड्यात घरोघरी जाऊन सर्वे, आवश्यकता भासतील त्यांच्या तपासण्या आणि तात्काळ बाधितांवर औषधोपचार ही त्रिसूत्री कटाक्षाने पाळली.

कोरोना अजून हद्दपार झालेला नसून त्याचे आव्हान कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. मोठ्या कष्टातून कोरोनामुक्तीच्या बाबत आजच्या घडिला ज्या 1 हजार 450 खेड्यांनी यश संपादन केले आहे ते यापुढेही टिकविण्यासाठी अधिक दक्षता घेतील अशा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.