कोविड-19 संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालयांनी सज्ज रहावे-सुनील चव्हाण

औरंगाबाद ,४ जून / प्रतिनिधी:-कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांची, बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांसह सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, बालरोगतज्ञ आणि  आरोग्ययंत्रणांनी उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे निर्देश   जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

Displaying IMG_20210604_181230.jpg

        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालकोविड संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत बालरोग तज्ञांसमवेतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देशित केले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, घाटीचे डॉ. दिक्षित, डॉ. एल.एस देशमुख, डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. अमोल जोशी यांच्यासह बालरोगतज्ञ, आरोग्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात संभाव्य तिसऱ्या लाटेतील संसर्गात 0 ते 18 वर्षाखालील वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत हा संसर्ग पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालय, सर्व बालरोगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य यंत्रणा यांनी सर्तक रहावे असे सूचित करुन श्री. चव्हाण यांनी घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालयासोबत सर्व खाजगी रुग्णालयांनी समन्वयपूर्वक संसर्गापासून वेळीच बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, वाढीव आवश्यक उपचार सुविधा, औषधसाठा यासह इतर सर्व बाबीचे पूर्वनियोजन प्रभावीपणे करावे. तसेच वाढीव प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ, खाटांची उपलब्धता सज्ज ठेवावी. घाटीने बालरोगतज्ञ, नर्स यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. तसेच आवश्यकतेनुसार मिल्क बँक सुविधा तयार ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील बालक, माता यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उपचार सुविधा जिल्हयात पूरेशा  प्रमाणात तयार ठेवाव्यात तसेच व्यापक प्रमाणात जनजागृतीव्दारे संसर्गापासून बचाव करण्याचे नियोजन करण्याचे सूचित केले.

       डॉ. येळीकर यांनी घाटीमध्ये गेल्या वर्षभरात कोविड अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम, रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत आलेले अनुभव याबाबत सविस्तर माहिती देऊन तिसऱ्या लाटेपासून होणारा धोका वेळीच रोखण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच लहान मुलांमधील संसर्ग अधिक जोखमीचा ठरु शकतो, याचे गांभिर्य लक्षात घेऊन सर्वांनी पूर्व तयारीसह सज्ज राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.  

डॉ. पाडळकर, डॉ. कुलकर्णी यांनी मनपा, जिल्हा रुग्णालयामार्फत्‍ करण्यात येत असलेल्या पूर्व तयारी बाबत माहिती दिली. तसेच बालरोग तज्ञांनी बाल कोविड प्रतिबंधात्मक उपाय, उपचार आणि पुर्वतयारीच्या अनुषंगाने सूचना केल्या.