गॅस एजन्सीच्या  परवाना आणि डिलरशीप च्या नावावर उद्दोजकला ५६ लाखांचा गंडा 

औरंगाबाद, ४ जून / प्रतिनिधी:-

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डिलरशीप देण्याचे फेक जाहिरातीव्दारे आमिष दाखवून उद्योजकाला ५६ लाखांना गंडविल्याप्रकरणी औरंगाबाद सायबर पोलिसांनी पाचव्‍या आणि मुख्‍य आरोपीला  झारखंडमधून अटक केली. नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग (२४, रा. हतीयारी बिमनवान काशी चौक नालंदा बिहार) असे आरोपीचे नाव असून त्‍याला तब्बल सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी शुक्रवारी दि.४ जून रोजी दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी काम पाहिले.

गुन्‍ह्यात यापूर्वी कालु शेख नेश मोहम्मद उर्फ शहाजहान, मोहम्मद अहसान रजा मोहम्मद ताहेर अलम उर्फ करिम, राजन कुमार नवल किशोर प्रसाद आणि बिनोद कुमार सिंह रामजी सिंह या चौघांना अटक करण्‍यात आली होती.

वाळुज औद्योगिक वसाहतीत चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९, रा. सिडको वाळुज महानगर-१, प्लॉट क्र. १०, सिडको कार्यालयाजवळ) यांची रविकिरण इंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. शहरातील एका दैनिकात १ ऑगस्ट २०१९ रोजी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या  गॅस एजन्सीची जाहिरात प्रकाशित झाली होती. या जाहिरातीव्दारे भामट्यांनी तांदळे यांना सुमारे 56 लाख 64 हजार 700 रुपयांना गंडा घातला. प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्‍ह्यात यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींनी सांगितले की, मुख्‍य आरोपी नितीश कुमार याच्‍याकडून रंजन कुमार याच्‍या मध्‍यस्‍थीने पैसे मिळत होते. आरोपीच्‍या बँक खात्‍यामध्‍ये ऑनलाईन फसवणूकीतून आलेली रक्कम विनोदकुमा आणि अंकीत (रा. झुमरी तलय्या) यांच्‍याकडे पाठविले जाते, त्‍याबदल्यात ते आमच्‍याकडून चढ्या भावाने फळे खरेदी करतात. फोन कॉल करने,वेबसाईट बनवणे व संगणकासंबंधीचे सर्व काम नितीश कुमार करतो. नितीशकुमार हा पश्चिम बंगाल मधुन सिमकार्ड खरेदी करतो व त्‍याचा वापर ऑनलाईन फसवणूक करण्‍यासाठी करतो. त्‍यानूसार पोलिसांनी आरोपीला २ जून रोजी झारखंड येथून अटक केली.