मेहुल चोक्सी जनतेचा पैसा बुडवून पळत असताना पंतप्रधानांनी तत्परता का दाखवली नाही? – नवाब मलिक

लसीकरणाबाबत केंद्राचे धोरण स्पष्ट नाही

मुंबई​,३ जून /प्रतिनिधी :-​ पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई…मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुल चोक्सी पळून जाताना त्याला पकडण्यासाठी का दाखवण्यात आली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

मेहुल चोक्सी यांना आणण्याबाबत कोणाचेही दुमत नाही, परंतु दोन-तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय. मुळात तो पळाला कसा हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. तो देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना पंतप्रधान मोदींनी का तत्परता दाखवली नाही, असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे ना. नवाब मलिक म्हणाले. तसेच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना कधी आणणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लसीकरणाबाबत राष्ट्रीय नीती तयार नाही

लसीकरणाबाबत केंद्राचे धोरण स्पष्ट नाही वा राष्ट्रीय नीती तयार नाही. त्यामुळे रोज नवीन नियम जाहीर केले जात आहेत. आता सुप्रीम कोर्टाने केंद्राच्या लसीकरण धोरणावर ताशेरे ओढल्यानंतर तरी केंद्र सरकार स्पष्टपणे संपूर्ण लसीकरण कार्यक्रम जाहीर करेल आणि कुणाची काय जबाबदारी आहे हे स्पष्ट होईल, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्यानंतरही लस खरेदी का झाली नाही? डिसेंबरपर्यंत २०० कोटी लशी मिळतील याचा कार्यक्रम कुठे आहे? राज्यांवर जबाबदारी का टाकली जात आहे? हे सर्व प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारची लसीकरणाबाबत ठोस नीती नसल्याचे समोर आले असल्याचे ना. नवाब मलिक म्हणाले. अमेरिकेसारख्या देशात मोफत लसीकरण केले जातेय, परंतु ३५ हजार कोटींची तरतूद करुनही केंद्र सरकार पैसे का खर्च करत नाही? असा प्रश्नही त्यांनी केंद्राला केला आहे.