उस्मानाबादेत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा  

उस्मानाबाद,१ जून /प्रतिनिधी :- उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी प्रशासन वेगाने कामाला लागले आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जमीन हस्तांतरणाबाबत आदेश काढले . त्यानुसार १० एकर जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

Osmanabad


महाविकास आघाडी शासनाने जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्यानंतर या विषयाच्या अनुषंगाने इतर कामांना गती मिळणे गरजेचे होते. त्यानुसार पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना याबाबत प्रशासकीय काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  

सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागा हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नाहरकत तात्काळ घ्याव्यात. जर यामध्ये अडथळे असतील तर याबाबत ईतर संबंधित विभागाशी समन्वय साधावा व प्रत्यक्ष चर्चा करावी. परंतु हा विषय तात्काळ मार्गी लावावा, अशा सूचना पालकमंत्री गडाख यांनी आढावा बैठक घेऊन सर्व विभागांच्या विभागप्रमुखांना दिल्या होत्या. त्यानुसार हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांची नाहरकत तात्काळ घेण्यात आली. विशेष म्हणजे कोरोणासारखे संकट असतानाही मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून जमीन हस्तांतरण हा विषय वेळेत मार्गी लावण्यासाठी  प्रयत्न केले. तसेच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांकडून आल्यानंतर आता ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी काढले आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. सुमारे १० एकर जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या ताब्यात असलेली इतर जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेपालकमंत्री शंकराव गडाख यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी इतर जिल्ह्याचा आधार घ्यावा लागत होता. यापुढे जिल्ह्यात उच्च दर्जाची आरोग्य सुविधा असावी, या नागरिकांच्या अपेक्षेला महाविकास आघाडीकडून प्रतिसाद मिळत आहे.
उस्मानाबाद येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी सारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सुध्दा जागेचा शोध सुरू आहे. त्यानुसार आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच आयटीआय कडे उपलब्ध असलेली अतिरीक्त जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तंत्रशिक्षण विभाग, आरोग्य विभाग व इतर शासकीय विभागात समन्वय साधून  
मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले. शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन विद्यालय  व इतर शासकीय विभागा कडील उपलब्ध जमीन मिळविण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.यानुसार या दोन्ही ठिकाणी जागेचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा प्राध्यापक
वर्गाची पद भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक पदांची  भरती करण्यात येणार आहे.त्यामुळे या शैक्षणिक वर्षांपासून जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.