रेमडेसिविरचा केंद्रीय पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

  • रेमडेसिविरच्या उत्पादनात दहा पटीने वाढ
  • देशात रेमडेसिविरचा पुरेसा साठा, मागणीपेक्षा पुरवठा जास्त
  • रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या राखीव साठा म्हणून कायम राखणार

नवी दिल्ली ,२९ मे /प्रतिनिधी :-

रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या औषधाचे उत्पादन 10 पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन 33,000 कुप्यांवरून 11 एप्रिल 2021 रोजी प्रतिदिन 3,50,000 कुप्या झाली, असे त्यांनी सांगितले.  

सरकारने केवळ एका महिन्यात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 20 वरून 60 वर नेली. आता देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविय यांनी दिली. मांडविय यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओ ला दिले आहेत.

आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारने रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.