सदोष  व्हेंटिलेटर पुरवण्याच्या मुद्दय़ावर केंद्र सरकार “असंवेदनशील” असल्याचा औरंगाबाद खंडपीठाचा  ठपका  

व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच-केंद्राचा दावा   

औरंगाबाद ,२९ मे /प्रतिनिधी :-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी मराठवाडा विभागातील रुग्णालयांना सदोष  व्हेंटिलेटर पुरवण्याच्या मुद्दय़ावर केंद्र सरकार “असंवेदनशील” असल्याचा ठपका ठेवला.देशभर वादग्रस्त ठरलेली “ती’ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारच्या वतीने औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत करण्यात आला.  या आठवड्याच्या सुरुवातीला औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयातील डीन आणि काही खासगी रुग्णालयांनी कोर्टाला सांगितले होते की पंतप्रधान केअर फंड अंतर्गत केंद्राकडून पुरवल्या जाणा १५० उपकरणांपैकी ११३ व्हेंटिलेटर सदोष आहेत.
केंद्राने कोर्टाला सांगितले होते की गुजरात-आधारित कंपनीने पुरवलेले व्हेंटिलेटर पंतप्रधान केअर  फंड अंतर्गत पुरवले जात नाहीत.ही “मॉडर्न’ व्हेंटिलेटर्स वापरण्याचे “प्रशिक्षण’ असलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने कंपनीची पाठराखण केली. “रुग्णालयातील कर्मचार्‍यांना अपुरे प्रशिक्षण दिले गेले असावे आणि व्हेंटिलेटर वापरणे त्यांना शक्य झाले नसेल,” असे केंद्राने कोर्टाला सांगितले.या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. त्यात ही व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवण्यात आली नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला. तसेच राजकोट येथील पुरवठादार कंपनी ज्योती सीएनसी यांची तळी उचलून औरंगाबादमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच ती व्हेंटिलेटर्स ऑपरेट करता आली नसल्याचा युक्तिवाद केला आहे.
खंडपीठाने म्हटले आहे की केंद्राने कंपनीच्या दाव्याची किंमत किती कमी आहे हे मान्य केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि प्रतिज्ञापत्रात ते या प्रकरणाकडे लक्ष देतील  असे म्हटले नाही.
नागरिकांच्या जीवापेक्षां बिघडलेले व्हेंटिलेटर बनविणाऱ्या  आणि पुरवठा करणाऱ्या  कंपनीबद्दल केंद्र सरकार अधिक चिंता करते अशा शब्दांत न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. 
या महिन्याच्या सुरूवातीला पंजाब सरकारने म्हटले होते की केंद्राने राज्यात पुरविलेल्या ३२० व्हेंटिलेटरपैकी ९०टक्के  उपकरणे सदोष असल्याचे म्हटले आहे. राजस्थान आणि झारखंड यांनी पंतप्रधान केअरच्या अंतर्गत सदोष व्हेंटिलेटर कार्यरत नसल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.केंद्राने या बदल्यात अनेक व्हेंटिलेटर कार्यरत स्थितीत नसण्याचे कारण म्हणून राज्यांनी वैद्यकीय उपकरणांच्या निगराणीला  जबाबदार धरले होते.

केंद्र सरकारने म्हटले आहे की एप्रिल २०२० मध्ये ६० हजार  व्हेंटिलेटरच्या  ऑर्डर देण्यात आल्या होत्या  आणि राज्यांना ४९ हजार ९६० उपकरणाचे  वाटप करण्यात आले आहेत. त्यातील सुमारे ५० हजार  पीएम केअर  फंड अंतर्गत पुरवठा करण्यात आला होता.  ४ हजार ८५४  व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्सला ३० हजार,आगवा हेल्थकेअरने १०हजार,आंध्र मेड-टेक झोनमध्ये १३ हजार ५०० आणि ज्योती सीएनसीला  ५ हजार व्हेंटिलेटर उपकरणे उत्पादित  करण्याचे काम दिले होते.
  शुक्रवारी व्हेंटिलेटर्ससह इतर प्रकरणांवरील सुनावणीत न्यायालयाचे मित्र म्हणून  सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे . ज्ञानेश्वर काळे, केंद्रातर्फे अजय तल्हार, पालिकेतर्फे तर्फे संतोष  चपळगावकर तर इतर प्रतिवादींतर्फे  एस. आर. पाटील, किशोर लोखंडे पाटील,  डी. एम. शिंदे,  आर. के. इंगोले यांनी काम पाहिले.