यंत्रणा आणि नागरिकांनी संयुक्त प्रयत्नांनी कोरोना रोखावा – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद (जिमाका) दि. 12 :-कोरोना संसर्गाच्या संकटकाळात बरी होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. शासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असून अनेक ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. औरंगाबादमध्ये सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कोरोनामुक्तीसाठी प्रयत्नशील असून यामध्ये नागरिकांची सतर्कता, सहभाग महत्वाचा आहे. त्यादृष्टीने यंत्रणा आणि नागरीकांनी संयुक्त प्रयत्नांनी कोरोनाचे संकट रोखण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शासन कोरोनाचे रुग्ण वाढू नये आणि बाधितांना योग्य उपचार तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी सक्रीयरित्या उपाययोजना राबवत आहेत. लॉकडाऊन नंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणांनी सर्व योग्य ती तयारी ठेवलेली आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, याच पद्धतीने भविष्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे. आरोग्य यंत्रणांनी पूरेसा औषधसाठा, मनुष्यबळ, आवश्यकतेपेक्षा अधिकच्या खाटांची, उपचार सुविधांची सक्षम व्यवस्था प्रशासनाच्या नेतृत्वात तयार ठेवावी. जीवीत संरक्षाणाला सर्वोच्च प्राधान्य देत रुग्णांसह संपर्कातील व्यक्ती, संशयित यांना आवश्यक उपचार देत असताना यामध्ये काम करत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आशा स्वयंसेविका, प्रयोगशाळेतील तपासणी करणारे व इतर सर्व संबंधितांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी आवश्यक सुविधा, संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखत असताना तातडीने  निदान होऊन रुग्ण आरोग्ययंत्रणेच्या संपर्कात वेळेवर आल्याने योग्य उपचार वेळेत करणे शक्य होते. त्यामुळे वेळेत निदान होण्याचे प्रमाण अधिक होण्यासाठी आवश्यक उपाय करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी ग्रामीण भागात तालुका स्तरावर सध्या उपचार सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यासोबतच जिल्हयातील रुग्णालयात ग्रामीण रुग्णांसाठी अतिरीक्त घाटा राखीव ठेवण्याचे नियोजन भविष्याच्यादृष्टीने ठेवावे, असे सांगितले.

ग्रामीण भागात लॉकडाऊन उठल्यानंतर काही प्रमाणात रुग्ण संख्येचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील कोरोना बाधितांवर यशस्वीपणे उपचार केले जात असून गंगापूर ग्रामीण रुग्णालयाने 27 रुग्ण त्यांच्या स्तरावर बरे करुन पाठवले आहे. तसेच घाटीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची इमारत ही एक- दोन दिवसात सुरु होणार असल्याने अतिरिक्त उपचार सुविधा जिल्हयात वाढेल. त्याचप्रमाणे खाजगी रुगणालयातील आयसीयुचे सर्व खाटा, कक्ष हे कोवीडसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन ही केलेले आहे. त्यामुळे कोविडची भविष्यातील संसर्गाची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आरोग्य यंत्रणा, मनपा आणि खाजगी रुग्णालय यांच्यासोबत समन्वय ठेऊन परिपूर्ण पूर्व तयारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आजघडीला 126 रुग्ण असून 45 रुग्ण बरे झालेले आहेत. ग्रामीण भागात हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत लोकसहभागातून, इतर यंत्रणांमार्फत यशस्वी उपाययोजना राबवल्या जात असून येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 6% आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच ठिकाणी स्वॅब तपासणी व इतर उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदावले यांनी दिली.

डॉ. येळीकर यांनी घाटीत 1177 खाटा उपलब्ध असून त्यापैकी 208 खाटांवर कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांना उपचार दिल्या जात असल्याचे सांगून घाटीतील कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 54 टक्के आहे. स्वॅब तपासणीचे काम येथील प्रयोगशाळेत तीन पाळीत सुरु असून चार हजार चाचण्या दररोज करण्यात येत असल्याची माहिती, डॉ. येळीकर यांनी दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मार्गदर्शक सूचनांनूसार गरोदर माता ज्या प्रतिबंधीत क्षेत्रातील आहे त्यांची तपासणी करण्यात आली असून पॉझिटीव्ह आढळलेल्या गरोदर मातांची योग्य ती काळजी घेण्यात येत असून त्यातील अनेक प्रसुती  या सुरक्षितपणे झाल्या असून बाळ व माता दोघांची प्रकृती उत्तम आहे. कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या इंजेक्शनची रक्कम शासन स्तरावरुन कमी केल्यास त्याचा रुग्णांना फायदा होईल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात आज घडीला 155 रुग्ण दाखल असून येथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.6 टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच दोनशे खाटापर्यंत जिल्हा रुग्णालय क्षमता वाढवणार असून याठिकाणी कोवीड मॅटर्निटी रुग्णालय बनवण्याचेही नियोजन सुरु असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

मनपा आयुक्त श्री. पांडेये म्हणाले लॉकडाऊन नंतर रुग्णसंख्येत वाढ झाली असून त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांना थर्मल गन आणि ऑक्सीमीटरचा वापर बंधनकारक केला आहे.  परिस्थिती नियंत्रणात असून शहरातील वाढीव रुग्णसंख्येचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची चाचणी करणे क्वारंटाइन करणे यावर प्राधान्याने भर देऊन  संसर्ग रोखण्यात यश मिळत आहे. तसेच कोविड संकटात काम करणाऱ्या आशा सेविका यांना कोवीडच्या पार्श्वभूमीवर मासिक दोन हजार रुपये, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाला पाच हजार आणि डॉक्टरांना दहा हजार रुपये अतिरीक्त मासिक निधी देण्यात येणार आहे. माझे आरोग्य माझ्या हाती या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत असून 50 पेक्षा वरील नागरीकांचे आरोग्य सर्वेक्षणही उपयुक्त ठरत आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देण्यात येत असून कोविड संसर्ग रोखण्याच्या मोहिमेला लोकचळवळ बनविण्याच्या दृष्टीने मनपा प्रयत्नशील असल्याची माहिती श्री. पांडेय यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात आणि शहरात कोवीडसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विस्तृत आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *