राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही,कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता

दोन दिवसांनी मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करणार 

मुंबई,२७मे /प्रतिनिधी :- 

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर नक्कीच कमी झाला. मात्र कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे उठवता येणे शक्य नाही. मात्र कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. टास्क फोर्स, आरोग्य मंत्रालय यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतोय. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे. 

राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असला तरी म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. पण आता कोरोनावर मात केल्यानंतर ही इतर आजारांचा धोका वाढत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर तरुण वर्गामध्ये देखील काही दिवस वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत आहेत. जे चिंता वाढवणारे आहेत. 

राज्याने काढलेल्या ग्लोबल टेंडरला काही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. तर काही कंपन्यांकडून आम्ही थेट केंद्राला लस देऊ असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लस आयात करण्याच्या विषयात केंद्र सरकारने लक्ष घालून एक राष्ट्रीय धोरण बनवावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आपण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण मोहीमेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, “राज्यात ४५ वर्षांवरील लसीकरणाला आम्ही प्राधान्य देत आहोत. काही जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील लसीकरण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर काही जिल्ह्यात अजूनही टक्केवारी कमी आहे. अशा जिल्ह्यांमध्ये लशींचा पुरवठा करुन त्यांना राज्याच्या सरासरीपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

राज्यात ३ लाख १५ हजार सक्रीय रुग्ण आहेत. यातील पाच ते सात टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असू शकतात. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण ग्रामीण भागात घरं लहान असतात. तिथे पॉझिटिव्ह रुग्ण आयसोलेशनमध्ये राहू शकत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवाव्यात असेही सांगण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.